कॉमनवेल्थ गेम्स 2030 स्पर्धेच्या आयोजनाचा मान अहमदाबादला मिळणार? कसं काय ते समजून घ्या

कॉमनवेल्थ गेम्स 2030 स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने कंबर कसली आहे. या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सर्व शक्यता पाहता या स्पर्धेचं आयोजन भारतात होईल, असं दिसत आहे. यासाठी अहमदाबादचं नाव पुढे करण्यात आलं आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2030 स्पर्धेच्या आयोजनाचा मान अहमदाबादला मिळणार? कसं काय ते समजून घ्या
कॉमनवेल्थ गेम्स 2030 स्पर्धेच्या आयोजनाचा मान अहमदाबादला मिळणार? कसं काय ते समजून घ्या
Image Credit source: TV9 Network/ एआई जनरेटेड फोटो
Updated on: Oct 15, 2025 | 7:53 PM

कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाने 2030 स्पर्धेच्या आयोजन कुठे करावं यासाठी चाचपणी सुरु केली आहे. असं असताना भारतातील अहमदाबादचं नावाचा प्रस्ताव पुढे आला आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारताने नायजेरियाला मागे टाकले आहे. आता हा प्रस्ताव कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या सदस्यांपुढे ठेवला जाईल. या प्रस्तावावर 26 नोव्हेंबर 2025 रोजी ग्लासगो येथे मोहोर लागण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम मंजुरी दिली जाईल.भारताला हा मान मिळाला तर 72 देशांचं आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल. कारण या स्पर्धेत 72 देशांचे खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. जर भारताच्या प्रस्तावावर मोहोर लागली तर आयोजनाची दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

कॉमनवेल्थ गेम्स मूल्यांकन समितीने सविस्तर आकलन करून हा प्रस्ताव पुढे ठेवला. सर्व प्रक्रियेचे पालन केल्यानंतर अहमदाबादची शिफारस करण्यात आली आहे.तांत्रिक बाबी, खेळाडूंचा अनुभव, पायाभूत सुविधा, प्रशासन आणि कॉमनवेल्थ गेम्सची मूल्ये लक्षात घेऊन हा प्रस्ताव पुढे पाठवला आहे. अहमदाबादकडे क्रीडाक्षेत्रातील जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक सुविधांचं शहर म्हणून पाहीलं जात आहे. क्रिकेटचं सर्वात मोठं स्टेडियमदेखील अहमदाबादमध्ये आहे.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2030 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी बोली लावण्याच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

2030 कॉमनवेल्थ स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण राष्ट्रकुल खेळ चळवळीच्या 100वा वर्धापन दिन असणार आहे. पहिला कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर दर चार वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते. सध्या 2026 मध्ये ग्लासगोत या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करण्यात येत आहे. 2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये ही स्पर्धा पार पडली होती. तेव्हा भारताने पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही अपेक्षा वाढल्या आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामुळे देशातील लाखो तरुणांना व्यावसायिकरित्या खेळ खेळण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.