मनु आणि नीरज चोप्रा यांच्याबाबत ‘त्या’ चर्चा रंगल्या, भाकरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं की…

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात सहा पदकं आली. यात नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांनी कमाल केली. आता या दोघांबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पण मनु भाकरच्या वडिलांनी याबाबत काय ते स्पष्ट केलं आहे.

मनु आणि नीरज चोप्रा यांच्याबाबत त्या चर्चा रंगल्या, भाकरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Aug 13, 2024 | 5:20 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरच्या कांस्य पदकानंतर शुभारंभ झाला. त्यानंतर सलग दुसरं पदक जिंकत मनु भाकरने ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला.  भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राची कमाल दिसली. रौप्य पदक जिंकत ऑलिम्पिक स्पर्धेतील सलग दुसरं पदक जिंकलं. पण मनु भाकर आणि नीरज चोप्रा हे दोघंही सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. नीरज चोप्रा, मनु भाकर आणि त्यांच्या आईचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात नीरज चोप्रा मनु भाकर आणि तिच्या आईशी बोलताना दिसत आहे. एका फोटोत नीरज आणि मनु भाकर बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत नीरज आणि मनुची आई एकत्र बोलत आहेत. इतकंच काय तर नीरज चोप्रा मनु भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. पण मनु भाकरच्या वडिलांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दैनिक भास्करच्या बातमीनुसार मनु भाकरच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की, त्या व्हायरल फोटोला काहीच अर्थ नाही.

मनु भाकरच्या वडिलांनी सांगितलं की, मनु खूपच लहान आहे. हे तिच्या लग्नाचं वय नाही. दुसरीकडे नीरज चोप्राबाबत सांगताना म्हणाले की, मनुच्या आईला तो तिच्या मुलासारखा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. मनु भाकर स्वतंत्र भारतातील पहिली स्पर्धक असून तिने एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवली आहेत. 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य आणि 25 मीटर एअर पिस्टल मिक्स स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं.

दुसरीकडे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल असं वाटत होतं. पण रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत एथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता पुढची ऑलिम्पिक स्पर्धा 2028 मध्ये लॉस अँजेलिस येथे होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही स्पर्धकांकडून पुन्हा अपेक्षा असणार आहेत.