
ठाणे : 16 सप्टेंबर 2023 | वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने ठाणे येथील ठाणे फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या लीगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डोंबिवलीतील पलावा फुटबॉल ग्राउंडवर अंडर 13, 15 आणि 17 अशा तीन वयोगटात ही स्पर्धा पार पडली. सहा दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून तब्बल 12 फुटबॉल संघ आणि 7 अकॅडमी सहभागी झाल्या होत्या. 13, 15 आणि 17 या वयोगटातील मुलींच्या संघाचे तब्बल 36 सामने खेळवण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील जोशूआ फुटबॉल अकॅडमी, ठाणे सीटी एफसी, रायन इंटरनॅशनल, फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया, सेक्रेड हार्ट फुटबॉल अकॅडमी, क्विन्स युनायटेड फुटबॉल अकॅडमी, रोअर फुटबॉल अकॅडमी या संघांचा समावेश होता.
13 वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद रोअर फुटबॉल अकॅडमीने पटकावले. तर 15 वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद ठाणे सीटी एफसी (TCFC) ने आणि 17 वर्षांखालील स्पर्धेत फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाच्या संघाने बाजी मारली.
नेहा घोलप (FSI – नवी मुंबई), समायरा शर्मा (FSI – नवी मुंबई) आणि किआरा सराफ (TCFC – ठाणे) यांना बेस्ट गोलकिपर म्हणून गौरविण्यात आले. तर, बेस्ट प्लेअर म्हणून झोया खान (जोशूआ फुटबॉल अकॅडमी), सना पालन (TCFC – ठाणे) आणि श्रावणी सावंत (रोअर FC) यांना गौरवण्यात आलं.
ठाणे फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष विजय पाटील आणि सुनील पुजारी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. कोरोना आणि लॉकडाऊननंतर प्रथमच पार पडलेल्या या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अशा स्पर्धांमुळे स्पर्धकांचा उत्साह वाढण्यास मदत होते अशी प्रतिक्रिया खेळत सहभागी झालेल्या खेळाडूंनी दिली.