
पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु असून दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताने या स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नेमबाज अवनी लेखराने अचूक नेमबाजी करत भारताला यश मिळवून दिलं आहे.अवनी लेखराने टोक्यो पॅरालिम्पिक 2020 स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं. आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 स्पर्धेत तिने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने 249.7 गुणांची कमाई केली आणि सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. तसेच या स्पर्धेत कांस्य पदकही भारताच्या नावावर राहिलं. मोना अग्रवालने 228.7 गुण मिळवत कांस्य पदकावर नाव कोरलं. त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण आणि कास्य पदक भारताला मिळालं आहे. तर रौप्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी लीच्या नावावर राहिलं.
अंतिम फेरीतील शेवटची संधी असताना अवनी दुसऱ्या स्थानावर होती. अवनी कोरियन युनरी लीपेक्षा 0.8 गुणांनी मागे होती. अंतिम फेरीत फक्त एक शॉट बाकी होता. पण कोरियनने 6.8 असा शॉट मारला आणि गणित चुकलं. तर या संधीचं सोनं अवनीने केलं. अवनीने पॅरिसमधील शूटिंग रेंजवर 10.5 चा अचूक वेध घेतला आणि अव्वल स्थान पटकावलं. अवनीने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सलग दुसऱ्यांदा सुवर्ण मिळवण्याची कामगिरी अवनी लेखराने केली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी भारतीची पहिली महिला एथलीट आहे. अवनीने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये कांस्य पदकही जिंकलं होतं.
GOLD 🥇 For INDIA 🇮🇳
Avani Lekhara wins gold medal in the Women’s 10m air Rifle SH1 event with a score of 249.7 🙌#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @ParalympicIndia @PCI_IN_Official @Media_SAI @AkashvaniAIR… pic.twitter.com/mcFf6gxQ1t
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 30, 2024
अवनी लेखराचा 2012 साली रस्ते अपघातात कंबरेखालचा भाग निकामी झाला होता. पण तिने इतक्या कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. तिने नेमबाजीत आपलं करिअर बनवलं. 2015 मध्ये पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, भारताकडून पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी यंदा 84 खेळाडूंचा चमू पाठवण्यात आला आहे. हे खेळाडू स्पर्धेतील 12 खेळांमध्ये भाग घेणार आहेत. यात 52 पुरुष, 32 महिला खेळाडू आहेत टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 54 खेळाडू पाठवले होते. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 9 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.