PBKS vs MI : पाऊस गेम करतो गड्या! पंजाबविरुद्ध मुंबईतील सामन्यात वरूणराजा पाणी फेरणार? हवामान खात्याचा काय दावा?

PBKS vs MI Weather Report : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालीफायर-2 खेळण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी अहमदाबादवर काळे ढगांची गट्टी जमली आहे. त्यामुळे सामन्यावर पाणी फेरणार का अशी चिंता चाहत्यांना लागली आहे.

PBKS vs MI : पाऊस गेम करतो गड्या! पंजाबविरुद्ध मुंबईतील सामन्यात वरूणराजा पाणी फेरणार? हवामान खात्याचा काय दावा?
पावसाचा सांगावा काय?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 10:56 AM

Narendra modi stadium Ahmedabad weather report : आज IPL 2025 चा क्वालीफायर-2 सामना खेळण्यात येईल. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात हा सामना होईल. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळण्यात येईल. सध्या अहमदाबादवर काळ्या ढगांची गर्दी जमली आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस कुणाचा गेम करणार याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. जर पाऊस पडला तर काय होईल, यावर सुद्धा चाहत्यांमध्ये तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.

पंजाब किंग्ससाठी करो या मरो

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सने अंक तालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. तर आरसीबी सोबतच्या पहिल्या पात्रता फेरीत पंजाब किंग्सने सामना गमावला. आता या संघाला अंतिम सामन्यात धडक देण्याची दुसरी आणि अखेरची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सने अंक तालिकेत चौथा क्रमांक मिळवला आहे. या संघाने तिसऱ्या क्रमांकावरील गुजरात टायटन्सला हरवले. आता या दोन संघामध्ये आज अंतिम सामन्यासाठीची पात्रता फेरी होईल.

पात्रता फेरीच्या या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला विजयासाठी खास रणनीती आखावी लागणार आहे. या संघाला त्यांचे तडाखेबंद फलंदाजांना अगोदर खेळवावे लागेल. जॉनी बेयरस्टोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तो दमदार कामगिरी करण्यासाठी आसुसलेला आहे. रोहित शर्माला सुद्धा सूर गवसला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्स संघाला आज करो या मरोची स्थिती आहे. कोणत्याही परिस्थिती हा सामना खिशात घालणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे.

हवामानाचा मूड कसा?

आज अंतिम सामन्यापूर्वीच्या पात्रता फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होत आहे. हा सामना अहमदाबाद स्टेडियमवर खेळण्यात येईल. दुपारी तापमान 34 डिग्रीच्या जवळपास असेल. तर संध्याकाळी 6 वाजता तापमान घसरण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी 7 वाजता नाणेफेक होईल. त्यावेळीच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी हवेतील आर्द्रता 55 टक्के ततर हवा ताशी 18 किमी वेगाने वाहिल. सामन्यापूर्वीच जर पावसाचे आगमन झाले तर त्याचा परिणाम सामन्यावर होईल.

पावसाने पिच नरम होईल. त्यामुळे खेळ संथ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा गोलंदाजांना नक्कीच होईल. फलंदाजांना या पिचवर तडाखेबंद खेळीसाठी खासा मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे. पण जर केवळ पावसाचे शिंतोडे आले, हलक्या सरी बरसल्या तर फलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने गोलंदाजीचा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते.