
भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल गुवहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर तिसरा टी20 सामना झाला. किवी टीमसाठी ही करो या मरो मॅच होती. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय योग्य ठरला. न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 153 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने सर्वाधिक 3 विकेट घेतले. पण खरी कमाल केली ते रवी बिश्नोईने. त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केलं. वर्षभरानंतर तो टीम इंडियात आला. रवी बिश्नोई भारतासाठी शेवटचा टी 20 सामना मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध खेळला होता.
त्यानंतर काल त्याने न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात कमबॅक केलं. रवी बिश्नोईच कमबॅक खूप शानदार ठरलं. त्याने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट काढल्या. रवीने ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमॅन यांची विकेट काढली. रवी बिश्नोई न्यूझीलंड विरुद्ध टी 20 स्क्वाडचा भाग नव्हता. पण वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी रवी बिश्नोईसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. वॉशिंग्टन सुंदर टी 20 वर्ल्ड कपचा भाग आहे. सुंदर वर्ल्ड कप सुरु होईपर्यंत फिट झाला नाही, तर त्याच्याजागी रवी बिश्नोईला टी 20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकतं.
नवीन फ्रेंजायची राजस्थान रॉयल्ससाठी खेळणार
25 वर्षाच्या रवी बिश्नोईने भारताकडून 2022 साली वनडे आणि टी 20 मध्ये डेब्यू केला होता. रवी भारतीय क्रिकेट टीमकडून 42 टी20 आणि एकमेव वनडे सामना खेळला आहे. बिश्नोईच्या नावावर वनडेमध्ये एक विकेट आहे. त्याशिवाय टी 20 मध्ये त्याच्या नावावर 61 विकेट आहेत. रवी बिश्नोईने आयपीएलमध्ये 2020 साली डेब्यु केला होता. त्याने 77 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2026 मध्ये रवी बिश्नोई नवीन फ्रेंजायची राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसणार आहे. भारताने न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया 3-0 ने पुढे आहे. अजून दोन सामने बाकी आहेत. भारतासमोर विजयासाठी 154 धावांच लक्ष्य होतं. भारताने अवघ्या 10 ओव्हरमध्ये हे टार्गेट पार केलं.