Rishabh Pant: फक्त एक मॅच खेळण्यासाठी ऋषभ पंतने थेट नावच बदललं, असं केलं तरी का?
Rishabh Pant Name Changed: ऋषभ पंतचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्याने आपलं नाव बदलल्याचे समजत आहे.

Rishabh Pant Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी २७ नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्चमध्ये सुरू होत आहे. पण त्याआधी ऋषभ पंतने एक मोठा बदल केला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या कौशल्याचा सराव करण्यासाठी हा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज क्राइस्टचर्चमध्ये ‘स्टॅन स्टॅन’ या नावाने एका स्थानिक सामन्यात खेळताना दिसला होता.
पंत ‘स्टॅन स्टॅन’ कसा बनला?
२९ वर्षीय ऋषभ पंत २५ नोव्हेंबर रोजी मध्य क्राइस्टचर्चमध्ये एका स्थानिक ‘लास्ट मॅन स्टँड्स’ सामन्यात खेळताना दिसला होता. या सामन्यात खेळणाऱ्या ‘ओपन हाऊस स्विंगर्स’ संघात एक खेळाडू कमी होता. त्यामुळे संघाने पंतला विचारले की तो त्यांच्यासाठी खेळेल का. या भारतीय स्टारने लगेच आपली बॅट उचलली आणि ‘स्टॅन स्टॅन’ या नावाने खेळायला सुरुवात केली.
‘ओपन हाऊस स्विंगर्स’ संघाचा खेळाडू मोहम्मद साफीने ‘न्यूझीलंड हेराल्ड’ला सांगितले की, त्याने पंतला इलेक्ट्रिक बाईक चालवताना पाहिले होते. मी जाऊन त्याला थांबवले, आणि आम्ही बोलायला लागलो, काही फोटो काढले, आणि मी त्याला विचारले, तुम्हाला आमच्यासाठी क्रिकेट खेळायला आवडेल का?'”
साफीने सांगितले की पंतने लगेच होकार दिला. साफीच्या म्हणण्यानुसार, पंतने त्याला सांगितले, “ठीक आहे. मी तुमच्यासाठी खेळायला येईन. मग तो आला, पॅड्स घातले, बॅटिंगला गेला आणि काही षटकार मारले.”
पंत हॅगली ओव्हलच्या अगदी जवळ असलेल्या हॅगली पार्क येथे ‘द चोझन वन्स’ विरुद्ध ओपन हाऊस स्विंगर्सकडून खेळला, जिथे पंत भारताची दुसरी कसोटी खेळणार आहे. सामन्याच्या धावफलकावर ‘स्टॅन स्टॅन’ असे नाव असलेल्या पंतने २१ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या आणि न्यूझीलंडमधील आपली प्रभावी धावसंख्या कायम ठेवली.