China-India Doklam : डोकलाम जवळ चीनने पुन्हा एकदा लावली फिल्डिंग, भूतानच्या ताज्या सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा
China-India Doklam : अलीकडच्या काही वर्षात भारत-चीनमध्ये बऱ्याचदा संघर्ष झाला आहे. चीनच्या भारताजवळच्या सीमेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरु असतात. आता पुन्हा एकदा चीनने असाच प्रकार केला आहे. यावेळी हे क्षेत्र डोकलाम आहे.

डोकलाम क्षेत्रात पुन्हा एकदा चीनच्या हालचाली दिसून आल्या आहेत. चीन पुन्हा एकदा डोकलाममध्ये डोकं वर काढतोय. ताज्या सॅटलाइट फोटोंमधून नवीन माहिती समोर आली आहे. भूतानाच्या तोर्सा नदी जवळच्या भागात जमिनीचा काही भाग साफ करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. चीन या भागात बांधकाम सुरु करणार असा संशय आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्सच्या 19 नोव्हेंबर 2026 च्या सॅटलाइट फोटोंवरुन भूतानच्या तोर्सा नदी परिसरात जमिनीचा काही भाग स्वच्छ करण्यात आल्याचं दिसत आहे. डोकलामच्या पश्चिमेला हे सर्व सुरु असल्याचा संशय होता. पण आता सॅटलाइट फोटोंवरुन हे डोकलामच्या पूर्वेचं लोकेशन दाखवत आहे. डोकलाम रणनितीक दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाचा भाग आहे.
भूतान सीमेवरही चीन दावा सांगत आला आहे. भूतान-चीनमध्ये जो सीमावाद आहे, त्या वादग्रस्त भागात चीनकडून गाव आणि वस्त्या निर्माण करण्याचं काम सुरु होतं. याआधीह सॅटलाइट फोटोंमधून चीनने भूतानच्या क्षेत्रात 22 गावं वसल्याची माहिती समोर आलेली. तोर्सा नदीच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचं काम पुढे बांधकामामध्ये बदल झाला, तर त्याचा भूतानच्या क्षेत्रीय सुरक्षेवर परिणाम होईल. भारत-भूतान-चीनचा रणनितीक त्रिकोण बाधित होईल. खासकरुन डोकलामच्या आसपासच्या भागात चीनची वाढती उपस्थिती भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.
आठ गावं डोकलामच्या एकदम जवळ
सायमनने जारी केलेल्या सॅटलाइट फोटोंमध्ये डोकलामच्या पूर्वेला तोर्सा नदीच्या तीन भागांमध्ये जमीन स्वच्छ केल्याचं दिसत आहे. चीन पुढे इथे बांधकाम करणार आहे का? हे स्पष्ट नाहीय. ज्या तीन भागांमध्ये सफाई करण्यात आली आहे, तिथे जवळच चीनने तीन गावं वसवली आहेत. चीनच्या संशयास्पद हालचालींमुळे आधीच हा भाग चर्चेत आहे. भूतानच्या भागात चीन बेकायद पद्धतीने गावं आणि वस्त्या वसवतं आहे, असा वर्ष 2020 पासून चीनवर सातत्याने आरोप होत आहे. डिसेंबर 2024 च्या एका रिपोर्ट्नुसार चीनने भूतानाच वादग्रस्त भाग ताब्यात घेऊन तिथल्या जमिनीवर कमीत कमी 22 गावं वसवली आहेत. त्यातली आठ गावं डोकलामच्या एकदम जवळ आहेत.
