
टीम इंडियाने काल नवीन इतिहास रचला. सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. आधी 2007, 2024 आणि आता 2026 असं तीनवेळा टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलय. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाने फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना आकर्षित केलय. टीम इंडियाने काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जिंकलेल्या दोन वर्ल्ड कपच्या तुलनेत हा तिसरा टी20 वर्ल्ड कप टीम इंडियाने मोठ्या फरकाने जिंकला.
भारताने पहिली फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 19 ओव्हरमध्ये 159 धावांवर आटोपला. टीम इंडियाने फायनलमध्ये 96 धावांनी मोठा विजय मिळवला. जसप्रीत बुमराह फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला, तर संजू सॅमसनने मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार पटकावला. टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन केलं. हा विजय पाहून पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू, रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने मोठं विधान केलय.
शोएब अख्तर काय म्हणाला?
टीम इंडिया पुढचा 50 ओव्हरचा वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सुद्धा फेव्हरेट आहे असं शोएब म्हणाला. “जर, 2027 चा वर्ल्ड कप आज मिळत असेल, तर आजच घेऊन टाका” असं शोएब अख्तर गेम ऑन है शो मध्ये म्हणाला. कालच्या महत्वाच्या फायनलमध्ये भारताच्या वरच्या तीन फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. तिथेच विजयाची पायाभरणी झाली होती.
पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी ओपनिंगला आलेली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी जोडली. त्यानंतर संजू आणि इशान किशनने दुसऱ्या विकेटसाठी सुद्धा 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. धावफलकावर 15.1 ओव्हर्समध्ये 203 धावा लागलेल्या असताना भारताचा दुसरा विकेट गेला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली. भारताने जो धावांचा डोंगर उभा केला, त्यासमोर न्यूझीलंडच्या टीमला एकाही टप्प्यावर विजयाचा विश्वास निर्माण होईल अशी कामगिरी करता आली नाही.