संधी चालून आली होती तरीही गंभीरने नाकारली, गावस्कर म्हणाले, जर असं केलं असतं तर किवींच्या नाकी नऊ आले असते

टीम इंडियाच्या एका निर्णयावर सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या खेळाडूला संधी दिली असती तर न्यूझीलंडच्या बॅटर्सना अनपेक्षित धक्का बसला असता. गावस्करांनी नेमकं काय सांगितलं?

संधी चालून आली होती तरीही गंभीरने नाकारली, गावस्कर म्हणाले, जर असं केलं असतं तर किवींच्या नाकी नऊ आले असते
Mohammed Siraj Selection Controversy
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 5:13 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजला संधी द्यायला हवी होती, असं मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्ध कृष्णाऐवजी सिराज खेळला असता तर न्यूझीलंडच्या बॅटर्ससाठी ते अनपेक्षित आव्हान ठरलं असतं, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रसिद्ध कृष्णाऐवजी सिराज का हवा होता?

गावस्कर यांच्या मते, न्यूझीलंडच्या बॅटर्सनी पहिल्या टेस्टमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगचा सामना केला होता. त्यामुळे त्याची बॉलिंग करण्याची पद्धत, दिशा आणि लांबी यांचा त्यांना अंदाज आला होता. अशा परिस्थितीत दुसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा प्रसिद्ध कृष्णाला संधी दिल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर नवीन आव्हान निर्माण झालं नसतं.

Loading...

याउलट मोहम्मद सिराज पहिली टेस्ट खेळला नव्हता. त्यामुळे तो पूर्णपणे फ्रेश होता. त्याच्या वेगवान बॉलिंगचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडच्या बॅटर्सना नव्याने तयारी करावी लागली असती. सिराजचा संघात समावेश केला असता तर भारतीय गोलंदाजीला वेगळी धार मिळाली असती, असं गावस्कर यांना वाटतं.

गावस्कर नेमकं काय म्हणाले?

सुनील गावस्कर यांनी या निर्णयाबाबत आपलं मत मांडताना सांगितलं की, एका फलंदाजी युनिटच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही ज्या गोलंदाजांचा सामना करणार आहात, त्यांच्यासाठी आधीच तयारी करता. न्यूझीलंडच्या बॅटर्सनी सिराजचा फारसा विचार केला नसता. त्यामुळे सिराज मैदानात उतरला असता तर त्यांच्यासाठी तो धक्का ठरला असता.

प्रसिद्ध कृष्णाची पहिल्या टेस्टमधील कामगिरी

प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंग मिळून 123 रन दिले आणि 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला दुसऱ्या टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र, आकाश दीपला दुखापत झाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाला कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आलं. याच निर्णयावर गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us