
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सूर गवसला आहे. त्याने काल न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. गुवहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर काल तिसरा टी 20 सामना झाला. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात जसप्रीत बुमराहने महत्वाचं योगदान दिलं. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने लौकीकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्याने तीन ओव्हरमध्ये 29 धावा देऊन एकही विकेट मिळाला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली. रविवारी पुन्हा त्याला संधी दिली. पाचव्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजीला आला. अगदी पहिल्याच चेंडूवर त्याने न्यूझीलंडला धक्का दिला.
पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याने टिम सीफर्टला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर बुमराहने मागे वळून पाहिलं नाही. बुमराहने मिचेल सँटनर आणि कायली जेमीसन यांच्या विकेट काढल्या. चार ओव्हरमध्ये त्याने 17 धावा देऊन 3 विकेट काढल्या. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना पहिल्या इनिंगनंतर जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही.
कोणाला काढून बुमराहला खेळवलं?
“सायमन डुल मगाशी जसं म्हणाला की, जसप्रीत बुमराह टीममध्ये असला की ती मॅच 16 ओव्हरची होते. आत्ताही तसचं झालं. 17 धावात तीन विकेट काढल्या. अविश्ननीय गोलंदाज. द बेस्ट, द बेस्ट, द बेस्ट, दे बेस्ट” या शब्दात गावस्कर यांनी बुमराहचं कौतुक केलं. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ते बोलत होते. अर्शदीप सिंहच्या जागी तिसऱ्या टी 20 साठी जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. अर्शदीपने दुसऱ्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 53 धावा मोजल्या. एकही विकेट काढला नाही. गुवहाटीच्या सामन्यात अजून एक बदल म्हणजे कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईचा टीममध्ये समावेश.
टी 20 वर्ल्ड कप कधी सुरु होतोय?
बिश्नोईने सुद्धा दमदार कमबॅक केलं. त्याने चार ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट काढले. सिलेक्टर्सच्या डोक्याचा ताप त्याने अजून वाढवलाय. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच टी 20 सामन्यांची सीरीज ही वर्ल्ड कप आधीची रंगीत तालिम आहे. 7 फेब्रुवारी रोजी टी 20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. आठ मार्चला टी 20 वर्ल्ड कपची फायनल आहे. भारत आणि श्रीलंकेत हा वर्ल्ड कप होणार आहे.