Varun Chakravarthy : न्यूझीलंडची वाट लावली, पण चपराक पाकिस्तानला, कारण ते वरुणबद्दल अपमानास्पद बोललेले

Varun Chakravarthy : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत-न्यूझीलंडमध्ये ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना झाला. या मॅचमध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडला अशा पद्धतीने फिरकीच्या जाळ्यात ओढलं की, त्यांचं कंबरड मोडून टाकलं. वरुण चक्रवर्तीने या प्रदर्शनाने जुना हिशोब चुकता केला आहे. वरुणच हे प्रदर्शन पाकिस्तानसाठी चपराक आहे. कारण ते भारताच्या या मिस्ट्री स्पिनरबद्दल अपमानास्पद बोलले होते.

Varun Chakravarthy : न्यूझीलंडची वाट लावली, पण चपराक पाकिस्तानला, कारण ते वरुणबद्दल अपमानास्पद बोललेले
varun chakravarthy
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 03, 2025 | 8:25 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्घ 44 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. वरुण चक्रवर्तीला सुरुवातीचे दोन सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण यावेळी त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. न्यूझीलंडच्या इनिंगची त्याने वाट लावून टाकली. वरुण चक्रवर्तीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. चार वर्षांपूर्वी दुबईच्या याच मैदानावर वरुण चक्रवर्तीला टीकेचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने त्याला गल्लीतला गोलंदाज म्हटलं होतं.

2021 चा T20 वर्ल्ड कप भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत. या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान टीमने टीम इंडियाला 10 विकेटने हरवलं होतं. वरुण चक्रवर्ती त्यावेळी टीमचा भाग होता. त्याची आयसीसी टुर्नामेंटमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ होती. पाकिस्तान विरुद्ध तो दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या टुर्नामेंटनंतर त्याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी काही वर्ष लागली. पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळाला नव्हता.

पाकिस्तानात वरुण चक्रवर्तीबद्दल काय म्हटलेलं?

या खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तानात वरुण चक्रवर्तीची भरपूर खिल्ली उडवण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी ओपनर सलमान बटने वरुण चक्रवर्तीला गल्लीतला गोलंदाज म्हटलं होतं. आपल्या यू-ट्यूब चॅनलवर सलमान बट म्हणालेला की, “पाकिस्तानात मुलं टेप बॉलने खेळतात. प्रत्येक मुलगा इथे अशी बॉलिंग खेळतो. त्यामुळे वरुण चक्रवर्तीबद्दल काही सरप्राइज नव्हतं. पाकिस्तानात प्रत्येक मुलगा गल्लीत क्रिकेट खेळताना अशा प्रकारची गोलंदाजी करतो. जिथे गोलंदाज चेंडूने फिंगर ट्रिक करतो. वेगवेगळे वेरिएशन करतात” पण आता वरुण चक्रवर्तीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.

एका खास लिस्टमध्ये स्थान मिळवलं

वरुण चक्रवर्तीचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील डेब्यु सामना होता. या मॅचमध्ये त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना खूप सतावलं. 10 ओव्हर्समध्ये 42 धावा देऊन पाच विकेट काढले. वरुण चक्रवर्तीने विल यंग, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेनरी यांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह त्याने एका खास लिस्टमध्ये स्थान मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या डेब्यु मॅचमध्ये पाच विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी मोहम्मद शमीने हा कारनामा केलेला. त्याने सुद्धा याच स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध ही कमाल केली.