विराटचा भावूक फोटो, धोनीने क्रिकेटला अलविदा केल्याचे संकेत?

| Updated on: Sep 12, 2019 | 7:03 PM

विराटने धोनीसोबतची (Virat Kohli and Dhoni) एक आठवण सांगत फोटो शेअर केला, ज्यामुळे धोनीच्या निवृत्तीविषयी पुन्हा चर्चा होऊ लागली.

विराटचा भावूक फोटो, धोनीने क्रिकेटला अलविदा केल्याचे संकेत?
Follow us on

मुंबई : दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी (Virat Kohli and Dhoni) सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. कर्णधार विराट कोहलीही याला अपवाद नाही. विराटने धोनीसोबतची (Virat Kohli and Dhoni) एक आठवण सांगत फोटो शेअर केला, ज्यामुळे धोनीच्या निवृत्तीविषयी पुन्हा चर्चा होऊ लागली. पण या केवळ चर्चाच असल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलंय. कारण, धोनीने निवृत्तीबाबत अजून काहीही कळवलेलं नाही.

विराटने गुरुवारी धोनीची आठवण काढत एक फोटो शेअर केला. विजयाचं सेलिब्रेशन करत असलेला हा फोटो आहे. विराट त्याच्या बॅटने धोनीला सलाम करत असल्याचं या फोटोमध्ये दिसतं. तो सामना, जो कधीही विसरु शकत नाही. खास रात्र, या व्यक्तीने मला फिटनेस टेस्ट घेतल्यासारखं पळवलं होतं, असं कॅप्शन देत विराटने धोनीलाही टॅग केलंय.

दरम्यान, हा फोटो 2016 च्या टी-20 विश्वचषकातील आहे. 27 मार्च 2016 रोजी मोहालीत खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात विराटने नाबाद 82 धावा केल्या आणि भारताने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला होता. मॅच फिनिशर धोनीने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर विजयी चौकार ठोकला होता.

या विजयासोबतच भारताने सेमीफायनलमध्येही स्थान पक्क केलं. सामनावीर ठरलेल्या विराटने पाचव्या विकेटसाठी धोनीसोबत मिळून 67 धावांची भागीदारी केली होती. मात्र यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताचा 7 विकेट्सने पराभव झाला होता. विंडीजने फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करुन विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

धोनी सध्या अमेरिकेत सुट्ट्या साजरा करत आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही निवडीसाठी उपलब्ध नव्हता. विराटला धोनीची आठवण होण्याचं कारण म्हणजे धोनी अनेकांसाठी फिटनेसचा आदर्श आहे. सध्या भारतीय संघाच्या खेळाडूंना यो यो टेस्ट द्यावी लागते, ज्यात पास झालं तरच पुढे खेळण्याची संधी मिळते. ही चाचणी पास करण्याचे मानदंड आणखी कठोर करण्याची तयारी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केल्याचं बोललं जातंय. यो यो टेस्ट पास होण्यासाठी सध्या 16.1 असलेला किमान मानदंड 17 केला जाण्याची शक्यता आहे.