
Washington Sundar Injury : टीम इंडियाचा स्पिन ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमधील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वडोदरा येथील पहिल्या वनडेमध्ये गोलंदाजी करताना सुंदरला दुखापत झाली होती. रिपोर्टनुसार, सुंदरच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळण्याबद्दल अनिश्चितता आहे. प्रश्न हा आहे की, वॉशिंग्टन सुंदरला काय झालय? त्याला कुठली दुखापत झालीय? सध्या त्याची हालत कशी आहे?. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने या बद्दल सामन्यानंतर अपडेट दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. 5 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना त्याला स्ट्रेच जाणवला. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला दुखत होतं. तो मैदानातच वाकला. टीमचा सपोर्ट स्टाफ त्याची तपासणी करण्यासाठी मैदानावर पळत आला. काही वेळात सुंदर मैदानाबाहेर गेला. वॉशिंग्टन सुंदरने एकूण 5 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 27 रन्स देऊन एकही विकेट घेतला नाही.
इंजरीनंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी त्याची गरज पडली. त्यावेळी दुखण्याची परवा न करता तो टीमसाठी मैदानावर उतरला. वॉशिंग्टन सुंदर 7 चेंडूत 7 धावांवर नाबाद राहिला. 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेला सुंदर एकूण 17 मिनिटं क्रीजवर होता.
त्यावर आम्ही अपडेट देऊ
“वॉशिंग्टन सुंदरच्या इंजरीवर हर्षित राणाने मोठी अपडेट दिली आहे. सुंदरला साइड स्ट्रेन आहे. फलंदाजी करताना त्याला खूप त्रास झाला. मेडिकल टीमचं त्याच्या इंजरीवर लक्ष आहे. जे काही होईल, त्यावर आम्ही अपडेट देऊ” असं हर्षित राणा म्हणाला.
त्याच्या जागी कोणाची रिप्लेसमेंट?
सुंदर वनडे सीरीजमधून बाहेर होणार की नाही? याबद्दल हर्षित राणाने ठोसपणे काही म्हटलेलं नाही. सुंदर सीरीजमधील उर्वरित दोन सामन्यांना मुकू शकतो, असं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातय. असं झाल्यास सुंदर ऋषभ पंतनंतर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमधून बाहेर होणारा दुसरा खेळाडू बनेल. टीम इंडियात पंतच्या जागी जुरेलचा समावेश करण्यात आला आहे. सुंदर सीरीजमधून आऊट झाल्यास त्याच्या जागी कोणाची रिप्लेसमेंट होणार याकडेही लक्ष असेल. टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 4 विकेटने विजय मिळवला.