जय श्रीरामच्या घोषणा रोखल्या, मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य, वासिम जाफरवर गंभीर आरोप

| Updated on: Feb 11, 2021 | 1:59 PM

Wasim Jaffer communal bias controversy : टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर (Wasim Jaffer) मोठ्या वादात सापडला आहे.

जय श्रीरामच्या घोषणा रोखल्या, मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य, वासिम जाफरवर गंभीर आरोप
Wasim Jaffer
Follow us on

नवी दिल्ली : प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर (Wasim Jaffer) मोठ्या वादात सापडला आहे. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहताना, धर्म पाहून खेळाडूंची (communal bias) नियुक्ती केल्याचा आरोप होत आहे. मात्र या आरोपानंतर वासिम जाफर कमालीचा नाराज झाला आहे. त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. (Wasim Jaffer communal bias controversy, jaffer rejects charge of favoring Muslim players as Uttarakhand coach, quashes CAU claim)

वासिम जाफरने 9 फेब्रुवारीला उत्‍तराखंड क्रिकेट टीमच्या (Uttarakhand Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मात्र याच संघाने जाफरवर धार्मिक सहानुभूती दाखवल्याचा, संघनिवडीदरम्यान मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. उत्‍तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांनी हा आरोप केला आहे. इतकंच नाही तर वासिम जाफरने संघातील खेळाडूंना जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यापासूनही रोखल्याचा आरोप आहे. मात्र हे सर्व आरोप जाफरने फेटाळले आहेत.

माहिम वर्मांचा आरोप काय?

माहिम वर्मांच्या आरोपानुसार, “मंगळवारी काही खेळाडू माझ्याकडे आले, त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. जाफर टीममध्ये धार्मिकीकरण करत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. काही खेळाडू रामभक्त हनुमान की जय ही घोषणा देऊ इच्छित होते. मात्र जाफरने त्यांना रोखलं. इतकंच नाही तर काही दिवसांनी बायो-बबल ट्रेनिंगमध्ये एक मौलवी आले आणि त्यांनी मैदानात दोनवेळा नमाज पठण केलं. मात्र या ट्रेनिंगमध्ये एक मौलवी प्रवेशच कसे करु शकतात? मी खेळाडूंना आपल्याला आधी का सांगितलं नाही असा प्रश्न केला”

माझ्यावरील आरोप निराधार – जाफर

दरम्यान, वासिम जाफरने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. जाफर म्हणाला, “सर्वात आधी मला हे स्पष्ट करायचं आहे की, रामभक्त हनुमान की जय ही घोषणा कधीच दिली गेली नाही. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळत होतो, तेव्हा खेळाडू ‘राणी माता सच्चे दरबार की जय’ अशी घोषणा देत होते. मी कधीच त्यांना जय हनुमान किंवा जय श्रीरामचा नारा देताना पाहिलं नाही. तो एक शीख धर्मियांचा नारा होता. टीममधील दोन शीख खेळाडू ही घोषणा देत होते.

आपण धर्मासाठी नव्हे, उत्तराखंडसाठी खेळतो

जाफर म्हणाला, “ज्यावेळी आम्ही बडोद्याला पोहोचलो, त्यावेळी मी खेळाडूंना सांगितलं, आम्ही एका धर्मासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळत आहोत. त्यामुळे आपली घोषणा उत्तराखंडसाठी हवी. आपली घोषणा, “गो उत्‍तराखंड, लेट्स डू इट उत्‍तराखंड आणि कमऑन उत्‍तराखंड” अशी हवी. जर मला धर्मालाच प्रमोट करायचं असतं, प्रसार किंवा प्रचार करायचा असता तर मी अल्लाह-हू-अकबरचा नारा द्यायला सांगितलं असतं. त्यामुळे माझ्यावरील धार्मिक आरोप चुकीचा आहे”

प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह

43 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 57 शतकं झळकावली आहेत. 260 प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने तब्बल 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं ठोकली. नाबाद 314 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या 

57 शतकं, 19 हजार धावा, प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरचा क्रिकेटला अलविदा