
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर ढेपाळली. फिरकी गोलंदाजी खेळणं एकवेळ टीम इंडियाचं बलस्थान होतं. पण आता त्याच फिरकीसमोर टीम इंडियाचे फलंदाज गुडघे टेकतायत. याच फिरकी गोलंदाजीचं आव्हान मोडून काढण्यासाठी मंगळवारी इडन गार्डन्सच्या नेट सेशनमध्ये एका खास बॉलरला बोलवण्यात आलं होतं. इडन गार्डन्सवरील पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात निकाली निघाला. फिरकीचा समर्थपणे सामना न करणं हे भारताच्या पराभवाचं मुख्य कारण होतं. दक्षिण आफ्रिकेचा ऑफ स्पिनर सायमन हार्मर आणि केशव महाराज भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीच्या याच धोक्याचा सामना करण्यासाठी एका खास गोलंदाजाला मंगळवारी नेट्समध्ये पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर या गोलंदाजाच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
बंगालचा स्पिनर कौशिक मैतीला नेट सेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करु शकतो. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 26 वर्षाच्या कौशिक मैतीने बंगालच प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याने दोन्ही हाताने फिरकी गोलंदाजी करुन भारतीय फलंदाजांना प्रॅक्टिस दिली. “भारतीय टीमच्या नेट्समध्ये गोलंदाजी करण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. इडन गार्डन्सवर आयपीएलच्या नेट्समध्ये विभिन्न फ्रेंचायजींसाठी मी गोलंदाजी केली आहे. आज मी साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा आणि देवदत्त पडिक्कल यांना ऑफ स्पिन गोलंदाजी केली. ध्रुव जुरेलला मी डावखुरी गोलंदाजी केली” असं कौशिक मैती म्हणाला.
हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं
हेड कोच गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांच्याकडून कुठेलही निर्देश देण्यात आले नव्हते, असं मैतीने स्पष्ट केलं. कौशिक मैती बंगालसाठी लिस्ट ए चे आठ आणि तीन टी 20 सामने खेळला आहे. “मला जशी गोलंदाजी करायची होती, त्यावर मी माझं लक्ष केंद्रीत केलं. भारतीय खेळाडू किंवा कोचने मला कुठल्या विशिष्ट क्षेत्रात गोलंदाजी कर असं सांगितलं नाही. जागतिक स्तराच्या खेळाडूंना गोलंदाजी करणं हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता” असं मैती म्हणाला. “रवींद्र जाडेजाला गोलंदाजी करणं आणि काही डाऊटस दूर करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे” असं कौशिक मैती म्हणाला.