उष्णतेने राउटर सतत ‘हँग’ होतोय? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि उपाय!

उन्हाळ्यात वायफाय स्लो होण्यामागे केवळ सेवा प्रदाताच जबाबदार नसतो, तर आपण राउटरची घेतलेली काळजी किंवा दुर्लक्षही तितकंच कारणीभूत असतं. वायफाय सतत बंद पडत असल्यास नवीन राउटर खरेदी करण्याऐवजी अशा योग्य पद्धतीने राउटर ठेवल्यास, उन्हाळ्यातही इंटरनेट स्पीड टिकून राहील आणि तुमचं डिजिटल जीवन सुरळीत चालेल.

उष्णतेने राउटर सतत हँग होतोय? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि उपाय!
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 1:21 PM

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट अनुभवली जात आहे. या झळाळत्या उन्हाचा परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नाही, तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही स्पष्टपणे दिसून येतो. विशेषतः इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी वायफाय राउटरच्या कार्यक्षमतेत घट ही सध्या मोठी समस्या ठरत आहे. “नेट खूप स्लो आहे”, “डिस्कनेक्ट होतंय” अशा तक्रारी अनेकांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र या समस्येमागे राउटरचं ओव्हरहिटिंग हे मुख्य कारण असल्याचं समोर येत आहे.

वायफाय राउटर हे आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घर आणि ऑफिससाठी अपरिहार्य उपकरण बनलं आहे. ब्रॉडबँड कनेक्शनमुळे मिळणारा जलद स्पीड, अनलिमिटेड डेटा आणि सततची कनेक्टिव्हिटी ही अनेकांसाठी नित्याची गरज झाली आहे. मात्र उन्हाळ्यात जर राउटर योग्य प्रकारे ठेवलं नाही, तर त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तापमान जास्त झाल्याने राउटर ‘हँग’ होतो, नेटवर्क स्लो होतं आणि अनेकदा कनेक्शन अचानक खंडित होतं.

राउटरच्या ओव्हरहिटिंगचे मुख्य कारणे:

* राउटर बंद कपाटामध्ये, कोपऱ्यात किंवा फर्निचरमागे ठेवला गेल्यास पुरेशी हवा खेळत नाही.

* थेट सूर्यप्रकाश किंवा घरातील अन्य उष्ण उपकरणांजवळ ठेवलेला राउटर अधिक तापतो.

* व्हेंट्समध्ये धूळ साचल्याने गरम हवा बाहेर पडू शकत नाही.

* घरात एसी नसल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळत नाही.

या त्रासावर उपाय काय?

1. राउटर ठेवण्याची योग्य जागा निवडा: राउटर नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा मोकळेपणाने फिरू शकेल. बंद अलमारीत किंवा कोपऱ्यात राउटर ठेवणं टाळा.

2. थेट ऊन टाळा: उन्हाळ्यात राउटरवर थेट सूर्यप्रकाश पडल्यास तो लवकर गरम होतो. त्यामुळे सावलीत ठेवणं आवश्यक आहे.

3. इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून लांब ठेवा: टीव्ही, मायक्रोवेव्ह, संगणक यांच्याजवळ राउटर ठेवल्यास अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन त्याचा परिणाम होतो.

4. टेबल फॅनचा वापर करा: जर वातानुकूलनाची सुविधा नसेल, तर छोट्या फॅनने राउटर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.

5. सफाई महत्वाची: दर महिन्याला राउटरच्या व्हेंट्सची कोरड्या ब्रशने सफाई करा, ज्यामुळे धूळमुळे अडथळा होणार नाही.