‘या’ टिप्सच्या मदतीने ओळखा तुमच्या मोबाईल फोनचा चार्जर खरा आहे की बनावट?

आपल्यापैकी अनेकजण बाजारातून स्वस्त मोबाईल चार्जर विकत घेतात, पण खरेदी केलेला हा चार्जर खरा आहे की बनावट हे ओळखणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण बनावट चार्जर तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. बनावट चार्जरमुळे काय नुकसान होऊ शकते आणि तो ओळखायचा कस हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

या टिप्सच्या मदतीने ओळखा तुमच्या मोबाईल फोनचा चार्जर खरा आहे की बनावट?
mobile phone charger
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 8:06 AM

आजच्या आधुनिक युगात आपल्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यातच भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. पण अनेकदा फोन खरेदी करताना पाहिले असेल की बऱ्याच फोन बनवणाऱ्या कंपन्या मोबाईल फोन सोबत चार्जत देत नाही, त्यामुळे तुम्हाला वेगळा चार्जर विकत घ्यावा लागतो. कारण चार्जर हा स्मार्टफोनचा एक अत्यावश्यक भाग आहे. याव्यतिरिक्त अनेकांचा मोबाईल चार्जर खराब होतो, तेव्हा बाजारात जाऊन स्वस्त चार्जर खरेदी करतात. पण बाजारात स्वस्तात मिळणारे चार्जर ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे ओळखणे ही तितकेच गरजेचं आहे.

कारण बाजारात तुम्हाला कमी किमतीत ओरिजिनल चार्जर असल्याचे अनेक कंपन्यांचे चार्जर मिळतील, पण ओरिजिनल चार्जर म्हणून विकला जाणारा चार्जर खरोखरच ओरिजिनल आहे याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे आजच्या लेखात आपण चार्जर ओरिजिनल आहे की नाही हे कसे ओळखायचे त्याबद्दल काही ट्रिक्स जाणून घेऊयात.

बनावट चार्जर: बनावट चार्जर धोकादायक का असतात?

बनावट चार्जरमध्ये अनेकदा निकृष्ट दर्जाचे घटक असतात, ज्यामुळे चार्जिंग दरम्यान चार्जर वेगाने गरम होऊ शकतो. शिवाय या निकृष्ट दर्जामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा आणि आग लागण्याचा धोका देखील असतो.

बनावट चार्जर योग्य पद्धतीने करंट आणि व्होल्टेज देत नाहीत, ज्यामुळे चार्जिंग सायकल खराब होऊ शकते. यामुळे फोनची बॅटरी जलद फुगू शकते आणि फोनचे नुकसान होऊ शकते.

बनावट चार्जरमुळे व्होल्टेज योग्यरित्या पुरवला जात नाही तेव्हा चार्जर फोनच्या मदरबोर्ड किंवा चार्जिंग आयसीला नुकसान पोहोचवू शकतो आणि यामुळे फोन पूर्णपणे खराब होऊ शकतो.

ओरिजिनल आणि बनावट चार्जरमधील फरक?

वजन: तुम्ही जेव्हा बाजारात चार्जर खरेदी करायला जाता तेव्हा ओरिजिनल चार्जर हा बनावट चार्जरपेक्षा थोडा जड वाटू शकतो, यामागील कारण म्हणजे ओरिजिनल चार्जरमध्ये चांगल्या दर्जाचा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो.

लेबलिंग आणि प्रिंटिंग: ओरिजिनल चार्जरवरील प्रिंटिंग स्पष्ट असते तर बनावट चार्जरवरील प्रिंटिंग अस्पष्ट दिसते. याशिवाय बनावट चार्जरवर लिहिलेल्या मजकुरात तुम्हाला कुठेतरी काहीतरी चूक नक्कीच दिसेल.

किंमत: जर ओरिजिनल चार्जरची किंमत 1200 असेल आणि तुम्हाला बाजारात तोच चार्जर 250 ते 300 रूपयांमध्ये मिळत असेल, तर विचार करा 250 रुपयांचा चार्जर ओरिजिनल कसा असू शकतो? बनावट चार्जरवर कंपनीचे नाव असल्याने तुम्ही खरेदी करत असलेला चार्जर ओरिजिनल आहे असे नाही. स्थानिक चार्जरवरही कंपनीचे नाव हुशारीने छापले जाते जेणेकरून लोकांना ते ओरिजिनल आहे असे वाटते. म्हणून ओरिजिनल चार्जर आणि तुम्ही बाजारातून खरेदी करत असलेल्या चार्जरमधील किमतीतील फरक विचारात घ्या त्यानंतरच चार्जर खरेदी करा.

अशातच तुम्ही महागडा फोन घेऊन त्याचे चार्जर डुप्लिकेट घेतले तर फोन लवकर डॅमेज होण्याचा धोका असतो. शिवाय बॅटरीही खराब होते, त्यामुळे फोनसाठी केलेला खर्च केवळ डुप्लिकेट चार्जरमुळे वाया जाऊ शकतो, म्हणून फोन घेतल्यानंतर त्याचा चार्जर ओरिजिनल असणं फार गरजेचं असतं.