Elon Musk Twitter | लागला मुहूर्त, ट्विटर वापरण्यासाठी रिकामा करा खिसा

Elon Musk Twitter | मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स(पूर्वीचे ट्विटर) वापरण्यासाठी युझर्सला खिसा खाली करावा लागणार आहे. गेल्या वर्षभरापासून ट्विटरवरील प्रयोग संपलेले नाही. एलॉन मस्क याने एक्सला पूर्णपणे धंदेवाईक करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसा मोजावा लागणार आहे..

Elon Musk Twitter | लागला मुहूर्त, ट्विटर वापरण्यासाठी रिकामा करा खिसा
| Updated on: Oct 18, 2023 | 2:00 PM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अब्जाधीश एलॉन मस्क याने गेल्यावर्षी ट्विटरचा ताबा घेतला. त्याचे नामकरण एक्स केले. तो आल्यापासून भराभर प्रयोग सुरु झाले. हजारो कर्मचारी सोडून गेले अथवा त्यांना नारळ देण्यात आला. लोगो बदलला. पेड व्हर्जन आले. तुफान बदल झाले. कार्यालये बंद झाली. कार्यालयातील खुर्च्यापासून ते इतर सामानाचा लिलाव झाला. आता एक्स वापरण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. त्याचा श्रीगणेशा या दोन देशांपासून सुरु झाला आहे. का करण्यात येत आहे हा प्रयोग?

या दोन देशात प्रयोग

सोशल मीडिया सेवा देणारा प्लॅटफॉर्म X वापरासाठी नवीन युझर्सला पैसा मोजावा लागणार आहे. न्यूझीलंड आणि फिलिपिन्समध्ये दरवर्षी नुतन वापरकर्त्याला जवळपास 1 डॉलर म्हणजे 83 रुपये मोजावे लागतील. एक्सने हे शुल्क का आकारण्यात येणार आहे. त्याची कारणमीमांसा केली आहे. त्यांच्या मते, कंपनीच्या Not a Bot या कार्यक्रमातंर्गत ही शुल्क आकारणी करण्यात येईल. शुल्कामुळे युझर्स हे सिद्ध करतील की त्यांचे खाते हे बॉट नाही. युझर्सला हे खाते त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकाशी सत्यापित करणे, व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.

हेल्प सेंटरने दिली माहिती

एक्सने याविषयीची माहिती हेल्प सेंटरवरुन दिली आहे. स्पॅम आणि बॉट खात्यांना कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी हे महत्वाचं पाऊल आहे.मस्क हे युझर्सला शुल्क अदा करायला सांगू शकतात, याची चर्चा गेल्यावेळेसच रंगली होती. अनेक प्लॅटफॉर्मवरुन मस्क यांनी याविषयीचे संकेत दिले होते. युझर्स जोपर्यंत निश्चित रक्कम अदा करत नाही. तोपर्यंत त्याला खात्याचा एक्सेस मिळणार नाही. युझर्सला काही नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केवळ दोनच देशांपासून सुरुवात


केवळ दोनच देशांपासून सब्सक्रिप्शन का सुरु करण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते ही केवळ चाचपणी आहे. या योजनेला दोन्ही देशातील युझर्स कसा प्रतिसाद देतात. ते कसा वापर करतात, याची टेस्टिंग होत आहे. यामाध्यमातून नवीन युझर्स तयार होतील का? हे समोर येईल. एकदा याचे परिणाम सकारात्मक आले की, ही योजना संपूर्ण जगभर लागू करण्यात येईल. मेटा या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. कारण त्यांना या प्रयोगामुळे युझर्स वाढविण्याची मोठी संधी मिळणार आहे.