
आजच्या स्मार्ट युगात स्मार्टफोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. त्यामुळे फोनची बॅटरी संपणे म्हणजे अर्धं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. या समस्येवर उपाय म्हणून पॉवर बँकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रवास असो की ऑफिस, पॉवर बँक हाच स्मार्टफोनचा ‘बॅकअप दोस्त’ ठरतो. पण जर तुम्ही पॉवर बँक खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर केवळ डिव्हाईस खराब होण्याचा धोका नसतो, तर खिशावरही मोठा ताण येतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पॉवर बँक खरेदी करताना कोणत्या 4 चुका टाळाव्यात.
1. फोनच्या बॅटरीपेक्षा 2.5 पट जास्त क्षमतेचा पॉवर बँक घ्या
पॉवर बँक खरेदी करताना सर्वात पहिले लक्ष द्या त्याच्या mAh म्हणजेच बॅटरी क्षमतेकडे. आजकाल बहुतेक स्मार्टफोन्समध्ये 5000mAh च्या आसपास बॅटरी असते, त्यामुळे किमान 10.000mAh किंवा त्याहून जास्त क्षमतेचा पॉवर बँक निवडा. तज्ज्ञांच्या मते, पॉवर बँकची बॅटरी ही फोनच्या बॅटरीपेक्षा 2.5 पट जास्त असावी. त्यामुळे तुम्ही फोन अनेकदा चार्ज करू शकता आणि पॉवर बँक वारंवार चार्ज करावी लागणार नाही.
2. योग्य आउटपुट व्होल्टेज नसेल तर फोन चार्ज होणारच नाही
पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या फोनच्या चार्जरच्या आउटपुट व्होल्टेजसारखाच असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर पॉवर बँकचा व्होल्टेज कमी-जास्त असेल, तर तुमचा फोन चार्ज होणार नाही. आणि काही वेळा यामुळे तुमच्या डिव्हाईसला नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे खरेदी करताना आउटपुट व्होल्टेज तपासणं विसरू नका.
3. युएसबी पोर्ट आणि चार्जिंग केबल तपासा
पॉवर बँक घेताना त्यामध्ये असलेल्या USB चार्जिंग पोर्टकडे लक्ष द्या. काही जुने पॉवर बँक केवळ त्यांच्या खास केबलनेच काम करतात. त्यामुळे तुमच्या फोनशी सुसंगत असलेल्या युएसबी टाईप-C किंवा टाईप-A पोर्ट्स असलेल्या पॉवर बँक निवडाव्यात. अन्यथा, तुम्हाला चार्जिंग करताना खूप अडचणींना सामोरे जावं लागेल.
4. एकापेक्षा जास्त डिव्हाईस असल्यास उच्च क्षमतेचा पॉवर बँक निवडा
आज अनेकांच्याकडे एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस असतात एक वैयक्तिक आणि एक ऑफिसचा फोन. अशा वेळी 15.000mAh किंवा 20.000mAh चा पॉवर बँक फायदेशीर ठरतो. पण जर तुमच्याकडे फक्त एकच डिव्हाईस असेल, तर 10.000mAh क्षमतेचा पॉवर बँक पुरेसा होतो.