
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने नुकताच T1 नावाचा नवा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. गोल्डन कलरच्या या फोनची किंमत 499 डॉलर (जवळपास 41,000 रुपये) ठेवण्यात आली असून तो गुगलच्या अँड्रॉइड सिस्टीमवर चालणार आहे. पण, काही वेगळीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये बनवण्यात आलाय का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पण, असं का होतंय, नेमकं प्रकरण काय, याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घ्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीचा दावा आहे की, हा फोन ‘मेड इन अमेरिका’ असेल, पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा दावा केवळ दिखावा आहे आणि हा स्मार्टफोन प्रत्यक्षात चीनमध्ये बनवला जाईल.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को गेरोनिमो यांनी सीएनबीसीला सांगितले की, हा फोन अमेरिकेत डिझाइन किंवा असेंबल करण्यात आलेला नाही. त्यांचा असा विश्वास आहे की हा फोन कदाचित चिनी ओडीएम (ओरिजिनल डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर) डिझाइन आणि तयार करेल.
काउंटरपॉइंट रिसर्चचे तज्ज्ञ ब्लेक प्रसेमिकी आणि जेफ फिल्डहॅक यांनीही अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात फोन निर्मिती सुविधा उपलब्ध नाहीत आणि कंपन्यांना चीनसारख्या ठिकाणाहून उत्पादन करणे अधिक व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला प्रोत्साहन देण्याबाबत वारंवार बोलले आहे. अमेरिकेत आयफोन असेंबल करण्याचा सल्लाही त्यांनी अॅपलला दिला, पण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनची निर्मिती करणे जवळपास अशक्य आहे आणि यामुळे उत्पादनाची किंमतही अनेक पटींनी वाढू शकते.
ट्रम्प T1 चे वर्णन “अमेरिकन मेड” म्हणून केले जात असले तरी त्याचे बहुतेक घटक परदेशी कंपन्यांकडून येणार आहेत. या फोनमध्ये 6.8 इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली असून ती सॅमसंग, एलजी (दक्षिण कोरिया) किंवा बीओई (चीन) यांच्याकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. या किमतीत मीडियाटेक (तैवान) चिपचा वापर शक्य आहे. क्वालकॉमकडे चिप असेल तर ती तैवानमध्येही बनवली जाईल. फोनमधील 50 एमपी कॅमेरा या मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सोनी (जपान) च्या इमेज सेन्सरचा वापर करू शकतो. रॅम आणि स्टोरेजमध्ये मायक्रॉन (यूएस) तंत्रज्ञान वापरता येते, परंतु सॅमसंग (कोरिया) सारखे इतर पर्यायही खुले आहेत.