
असे म्हणतात की, कोणी तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मदत केली तर ती कधीही विसरू नये. कधीकधी छोटीशी मदत एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. नुकताच असाच एक प्रसंग समोर आला. हा प्रसंग एका मुलाने लिंक्डइनवर शेअर केला आहे. या प्रसंगाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत. ही आहे एका तरुणाची आणि स्विगी डिलिव्हरी एजंट अनुजची कहाणी, ज्याच्या दयाळूपणाने आणि मदतीने त्या तरुणाला नोकरी मिळाली.
अकाश भोले नावाच्या व्यक्तीने लिंक्डइनवर ही कहाणी शेअर केली. तो दिवस त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा होता, त्याची जॉब मुलाखत होती. त्या दिवशी वेळेवर ऑफिसला पोहोचणे त्याच्यासाठी अत्यंत गरजेचे होते. पण, प्रचंड वाहतूक कोंडी आणि कॅब न मिळाल्याने तो हैराण झाला होता. त्याच वेळी, त्याच्या फ्लॅटमेटने खाण्याची ऑर्डर दिली होती. दरम्यान, अकाशने धैर्य एकवटून स्विगी डिलिव्हरी एजंटकडून मदत मागण्याचा निर्णय घेतला. त्याने अनुजला विचारले की, तो त्याला आपल्या बाइकवर ऑफिसला सोडू शकतो का?
वाचा: फाजील धाडसाने घात केला! नाग पाहताच पोलीस जवळ गेला, केलं असं काही की जीवच…
दयाळू डिलिव्हरी एजंटची मदत
अनुज, जो डिलिव्हरी घेऊन आला होता, त्याने कोणताही संकोच न करता म्हटले, “हो हो भाई! चल, नोकरीचा सवाल आहे.” त्याने हेही सांगितले की त्याने आपल्या दिवसाचे टारगेट पूर्ण केले आहे, त्यामुळे त्याला काही अडचण नाही. अनुजने अकाशला ऑफिसपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. ही छोटीशी मदत इतकी प्रभावी ठरली की अकाश ती नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला. घाईघाईत अकाश अनुजचा नंबर घ्यायला विसरला. पण त्याने हे सुनिश्चित केले की जगाला कळावे की अनुजने त्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवला. अकाशने लिंक्डइनवर पोस्ट करत लिहिले- “अनुज जी, तुम्ही कुठेही असाल, तुमच्या दयाळूपणाने माझे आयुष्य बदलले. स्विगी, या व्यक्तीला प्रमोशन नक्की द्या!”
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
ही पोस्ट वाचताच लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ती व्हायरल केली. सोशल मीडियावर युजर्सनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “दयाळूपणा आणि मानवतेचा आदर्श.” दुसऱ्याने लिहिले की, “कधीकधी मोठमोठे हिरोही स्विगीचे जॅकेट घालतात. अनुज जी यांनी जे केले ते विसरण्यासारखे नाही.” तिसऱ्या युजरने लिहिले- “या कहाणीने मला खूश केले. एका डिलिव्हरी पार्टनरमुळे कोणाला नवी नोकरी मिळाली.” चौथ्या युजरने म्हटले की, “नव्या नोकरीसाठी खूप खूप अभिनंदन. दयाळूपणा आणि मेहनतीची अप्रतिम कहाणी.”