
नाशिक शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन काळे घोडे घेऊन काही संशयित शहरात फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

संशयितांकडून जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायात ठोकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अंधश्रद्धेमुळे या नालांना मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे.

काळ्या घोड्यांच्या नालामुळे भरभराट होते, या गैरसमजामुळे अंधश्रद्धाळू नागरिकांकडून नाल कोणत्याही किमतीत खरेदी केली जात होती.

या प्रकरणाचा शोध नाशिकच्या मंगलरूप गोशाळा टीमकडून गेल्या चार दिवसांपासून सुरू होता. अखेर एबीपी सर्कल परिसरात संबंधित संशयित सापडून आले.

मंगलरूप गोशाळा टीमने संशयितांचा समाचार घेत समज दिली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्राण्यांवरील छळ दिसल्यास तात्काळ विरोध करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.