
सध्या संपूर्ण जगात पावसाने थैमान घातले आहे. नुकताच सुपर टायफून रागासान या वादळामुळे हाहाकार माजला. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह आलेल्या या विध्वंसात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या वादळामुळे संपूर्ण रस्त्ये जलमय झाले आहेत. या पाण्यात अनेकजण मासे पकडण्याची मजा घेत आहेत. या वादळामुळे झालेल्या नुकसान विसरून लोकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मासे पकडण्यास सुरुवात केली आहे. हे व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
नेमकं काय झालं?
सुपर टायफून रागासाने चीनपासून हाँगकाँगपर्यंत हाहाकार माजवला आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह आलेल्या या विध्वंसात अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर काही जखमी झाले आहेत आणि काही लोक बेपत्ता झाले आहेत. या भयंकर वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे तलाव झाले आहे. यामध्ये मकाऊचाही समावेश आहे. दरम्यान, येथील लोकांना एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, मकाऊच्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे येथे मोठमोठे मासेही आले आहेत. ते पकडण्यासाठी लोक जाळ्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उभे दिसत आहेत.
After #TyphoonRagasa, seawater flooded #Macau streets — now residents are wading in and catching fish like it’s a giant pond. #typhoon pic.twitter.com/PUNYZGE8MT
— Shanghai Daily (@shanghaidaily) September 24, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक मासे पकडण्याच्या जाळ्यांसह आणि प्लास्टिकच्या पिशव्यांसह पूरग्रस्त रस्त्यांवर वादळामुळे आलेले मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी त्यांच्या सायकलींवर मासे मागच्या सीटवर ठेवल्याचे पाहायला मिळाले. तर काहींनी मासे पकडून त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले आहेत. शांघाय डेलीने शेअर केलेल्या या व्हिडीओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर लोकांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओमध्ये मकाऊच्या रस्त्यांवर स्थानिक लोकांची मोठी गर्दी दिसत आहे, जी मोठ्या संख्येने मासे पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि काही यात यशस्वीही झाले.
मकाऊच्या रस्त्यांवर साचले समुद्राचे पाणी
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘टायफून रागासानंतर मकाऊच्या रस्त्यांवर समुद्राचे पाणी साचले आहे. आता रहिवासी त्यात उतरत आहेत आणि मासे पकडत आहेत, जणू हे एक विशाल तलाव आहे.’ अवघ्या 19 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.