
जुलै 2025 मध्ये काही तरी मोठं होण्याची ती भयावह भविष्यवाणीने पूर्व देशांमध्ये संभ्रमाचंच नाही तर भीतीचं वातावरण पसरलं आहे. आशियातील अनेक देशात भीतीचे आणि सतर्कतेचे वातावरण आहे. समाज माध्यमांवर या देशाविषयीचे ते भाकीत आगीसारखे पसरले आहे. जपानची बाबा वेंगा म्हणून ओळखली जाणारी रिओ तात्सुकीचे भाकीत सध्या भीतीचे कारण ठरले आहे. अनेक पर्यटकांनी या देशाच्या ट्रिप रद्द केल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटचे आणि विमानाचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. रिओ तात्सुकीच्या स्वप्नांनी अनेकांची सध्या झोप उडवली आहे.
“The Future I Saw” च्या ताज्या आवृत्तीत दावा काय?
रियो तात्सुकी हिचे एकदम लोकप्रिय कॉमिक “The Future I Saw (2021)” मध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. 5 जुलै 2025 रोजी जपानमधील दक्षिण समुद्रात पाणी उसळी घेईल, ज्वालामुखीचा विस्फोट होई आणि एक विनाशकारी त्सुनामी येईल अशी भीती तिने चितारली आहे. ही त्सुनामी केवळ जपानच नाही तर तैवान, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि भारताच्या किनाऱ्याला प्रभावित करतील.
भविष्यवाणी खरंच खरी ठरणार?
तात्सुकी लोकप्रिय होण्यामागे यापूर्वी तिने केलेली भाकितं खरं ठरणं हे प्रमुख कारण आहे. 1999 मध्ये तिने एक भाकीत केले होते. त्यानुसार 2011 मध्ये फुकूशिमा येथे भूकंप आणि अणू प्रकल्प बाधित होण्याचे भयावह चित्र रेखाटले होते. त्याचे वर्णन तिच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत करण्यात आले होते. ते खरे ठरल्याने आता तिने जे भाकीत केले आहे. त्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
भीतीने अनेकांनी बुकिंग केलं रद्द
जुलै 2025 मध्ये रिओच्या त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे जपान, इंडोनेशिया आणि तैवान येथे जाणाऱ्या पर्यटकांनी धसका घेतला. अनेकांनी ट्रॅव्हल एजन्सींना फोन करून जुलै महिन्यातील बुकिंग एकतर पुढे ढकलले आहे अथवा ते रद्द केलेले आहे. हे बुकिंग 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. इस्टर हॉलीडेच्या बुकिंगमध्ये पण मोठी घसरण झाली आहे. पर्यटकांच्या मते रिओ तात्सुकीच्या भविष्यवाण्या यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ते कोणताही धोका स्वीकारू शकत नाही. अर्थात विज्ञानाच्या कसोटीवर या दाव्याला कोणताही आधार नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.