पुराच्या पाण्यात वाहून आलेले साप थेट घरात शिरले, नागरिकांची तारांबळ; Video पाहून अंगावर येईल काटा

China Snake Video : चीनमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे सापांच्या प्रजनन केंद्राचे मोठे नुकसान झाले आणि तब्बल 900 साप बाहेर पडले. यामध्ये विषारी कोब्रांचाही समावेश असल्याचेही समोर आले आहे.

पुराच्या पाण्यात वाहून आलेले साप थेट घरात शिरले, नागरिकांची तारांबळ; Video पाहून अंगावर येईल काटा
China Snake Video
Image Credit source: Google
| Updated on: Jul 11, 2026 | 3:49 PM

चीनमधील काही भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे सापांच्या प्रजनन केंद्राचे मोठे नुकसान झाले आणि तब्बल 900 साप बाहेर पडले. यामध्ये विषारी कोब्रांचाही समावेश असल्याचेही समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पुराच्या पाण्यात साप वाहून आल्याची घटना चीनच्या गुआंग्शी झुआंग स्वायत्त प्रदेशातील हेंगझोउ येथील देंगवेई गावात घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात भीषण पूर आला. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, पुराचे पाणी सापांच्या प्रजनन केंद्रात शिरल्याने तेथील संरचना कोसळली आणि मोठ्या प्रमाणात साप आजूबाजूच्या परिसरात पसरले.

एकीकडे पूर, दुसरीकडे विषारी सापांचा धोका

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. सापांना पकडण्यासाठी 10 सदस्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाकडे फिशिंग नेट, स्टन गन आणि इतर आवश्यक उपकरणे देण्यात आली आहेत, जेणेकरून सापांना सुरक्षितपणे पकडून नागरिकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखता येईल.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पुराच्या पाण्यात अनेक साप पोहताना दिसत आहेत. हे दृश्य समोर आल्यानंतर प्रशासनाने आसपासच्या गावांतील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण काही ग्रामस्थांना साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागांत औषधे आणि वैद्यकीय सुविधांचा तुटवडाही असल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे. काहींनी याला सर्वात भयानक स्वप्न असे म्हटले, तर काहींनी अशी परिस्थिती कल्पनेपलीकडची आहे अशी प्रतिक्रिया दिली. पूराचा परिणाम केवळ माणसांवरच नाही, तर प्राण्यांवरही झाला आहे असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बाहेर पडलेल्या सापांना पकडणे आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा करणे यावर आहे.

Follow Us