20 रुपयांच्या वडापावसाठी तरुणीने खर्च केले 15 हजार, चक्क फ्लाइट पकडून पोहोचली मुंबईत

Vada Pav : दिल्लीतील एका कंटेंट क्रिएटरने वडापाव खाण्यासाठी थेट शहरच बदलले. दिल्लीतील वडापाव तिला आवडला नाही, त्यामुळे तिने चक्क मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट पकडली. यासाठी 15 हजार रुपये खर्च केले.

20 रुपयांच्या वडापावसाठी तरुणीने खर्च केले 15 हजार, चक्क फ्लाइट पकडून पोहोचली मुंबईत
Vadapav 15000 Spent
Image Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 10:21 PM

जगात खवय्यांची कमी नाही. एखाद्या खाद्यपदार्थाची आवड एखाद्या व्यक्तीला किती दूर घेऊन जाऊ शकते? कदाचित काही किलोमीटर दूर जाणे स्वाभाविक आहे. मात्र, दिल्लीतील एका कंटेंट क्रिएटरने वडापाव खाण्यासाठी थेट शहरच बदलले. दिल्लीतील वडापाव तिला आवडला नाही, त्यामुळे तिने चक्क मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट पकडली. विशेष म्हणजे, ज्या वडापावसाठी तिने एवढा लांबचा प्रवास केला, त्याची किंमत फक्त 20 रुपये होती. संपूर्ण प्रवासासाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च केल्यानंतर या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो चर्चेचा विषय ठरला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिल्लीतील वडापाव आवडला नाही

या तरुणीने सांगितले की, दिल्लीमध्ये वडापाव खाल्ला असता त्याची चव तिला फारशी आवडली नाही. त्यामुळे मुंबईत जाऊनच खऱ्या वडापावचा आस्वाद घ्यायला हवा, असे तिला वाटले. त्यानंतर तिने जास्त वेळ न घालवता मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ती कॅबमध्ये असतानाच थेट विमानतळाच्या दिशेने निघाली. दिल्लीहून मुंबईच्या फ्लाइटसाठी तिने सुमारे 5 हजार रुपये खर्च केले.

चहा ते नूडल्सपर्यंत अतिरिक्त खर्च

प्रवास सुरू करण्यापूर्वी विमानतळावर तिने 165 रुपयांचा चहा घेतला. संध्याकाळच्या फ्लाइटमध्ये भूक लागल्यानंतर तिने 300 रुपयांचे कप नूडल्सही खरेदी केले. संध्याकाळी 7 वाजता ती मुंबईत पोहोचली. मात्र, तिच्या आवडत्या वडापावपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काही वेळ लागणार होता. मुंबईत तिला सुमारे 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 70 मिनिटे लागली. त्यानंतर तिने रात्री मुक्कामासाठी 4 हजार रुपयांचे हॉटेल बुक केले. दुसऱ्या दिवशी तिने कोणत्याही ॲपवरून वडापाव ऑर्डर करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर जाऊन वडापाव खाण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या स्ट्रीट फूडचा खरा अनुभव घ्यायचा असल्याचे तिने सांगितले.

20 रुपयांचा वडापाव खाल्ला आणि म्हणाली…

बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर तिला एका स्टॉलवर वडापाव मिळाला. त्याची किंमत होती फक्त 20 रुपये. वडापावचा पहिला घास घेतल्यानंतर मुंबईत येण्याचा निर्णय योग्य असल्याचे तिने मान्य केले. हा आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला वडापाव असल्याचे तिने म्हटले. तिच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट, हॉटेल आणि इतर खर्च मिळून संपूर्ण प्रवासासाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च झाले.

सोशल मीडियावर रंगली मजेशीर चर्चा

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने मजेशीर कमेंट करत म्हटले की, 15 हजार रुपये खर्च केल्यानंतर वडापावची स्तुती करणे तर बनतेच! काही जणांनी तिचे खाद्यपदार्थांवरील प्रेम समजून घेतले, तर काहींनी केवळ 20 रुपयांच्या स्नॅकसाठी 15 हजार रुपये खर्च केल्याबद्दल तिची खिल्ली उडवली. एका यूजरने तर या प्रकाराला श्रीमंतांचा स्ट्रगल असेही म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us