
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे त्यांच्या बेधडक वागणं, खळबळजनक निर्णय आणि तशाच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेतच. अख्खया जगाला ट्रंप यांची विविध , अतर्क्य वक्तव्यं माहीत आहेत. पण आता त्यांनी त्यांच्याच ऑफीसमधील महिलेसाठी जे शब्द वापरलेत, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचे कौतुक करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलंय, त्यामुळे नव्या वादाची चिन्ह असून त्यांच्याच देशात नव्हे तर परदेशातही याचे पडसाद उमटू लागले आहेत, वाद निर्माण झाले आहेत.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रंप ?
न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी लेविटचे कौतुक केलं खरं पण त्यांच्या शब्दांनी मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्य आहेत. “माझ्याकडे असलेली सर्वोत्तम प्रेस सेक्रेटरी” असे व्हाईट हाऊसमधील प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट हिचे कौतुक करताना ट्रप म्हणाले. मात्र याच दरम्यान त्यांच्या शब्दांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. “ती एक स्टार बनली आहे. तो चेहरा, ती बुद्धिमत्ता, ते ओठ… ज्याप्रमाणे ते (ओठ) हलतात, जणू एखादी मशीनगनच सुरू आहे. ती खरंच एक शानदार व्यक्ती आहे ” असं ट्रंप म्हणाले.
कोण आहे कॅरोलिन ?
27 वर्षांची कॅरोलिन लेविट ही डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली आणि एकूण पाचवी प्रेस सेक्रेटरी आहे.एक दिवस आधी, व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत, लेविट हिने ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली. ट्रंप यांनी गेल्या सहा महिन्यांत “जवळजवळ दर महिन्याला शांतता करार किंवा युद्धबंदी” घडवून आणली आहे असा दावाही तिने केला.
त्यानंतर ट्रंप यांनीही लेविटचे कौतुक केलं. पण ट्रंप यांनी वैयक्तिक शैलीत केलेली प्रशंसा ही अनेकांना विचित्र आणि अस्वस्थ करणारी वाटली. सोशल मीडियावर त्यांच्या ही टिपण्णीचे “अव्यावसायिक”, “क्रिटिंग” आणि “त्रासदायक” असे वर्णन केलं गेलं.
सोशल मीडियावर कमेंट्स
एका यूजरने लिहिलं की, “जर एखाद्या पुरुषाने सामान्य कार्यालयातील महिला सहकाऱ्याबद्दल असे काही म्हटलं असतं तर त्याला ताबडतोब काढून टाकलं असतं आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला असता.” अनेक यूजर्नसी माध्यमांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर “कोणताही मेनस्ट्रीम मीडिया, ट्रम्प किंवा व्हाईट हाऊसला या हास्यास्पद आणि विचित्र गोष्टींबद्दल प्रश्न विचारेल का? कदाचित नाही.” असं आणखी एकाने लिहीलं.
या विधानामुळे ट्रंप यांची आधीच वादग्रस्त प्रतिमा, आणखी खराब झाली आहे, विशेषतः लोक महिलांसोबतच्या त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत आहेत.