निळ्या ड्रममध्ये जावं लागलं तरी..; लग्नात वर-वधूला पंडिताकडून अजब वचन, एकच पिकला हशा!

लग्नादरम्यान वर-वधूला पंडितांनी जे वचन बोलायला लावलं, ते ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

निळ्या ड्रममध्ये जावं लागलं तरी..; लग्नात वर-वधूला पंडिताकडून अजब वचन, एकच पिकला हशा!
लग्न लावणारे पंडित
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2026 | 2:20 PM

हिंदू विवाहपद्धतीत जेव्हा वर आणि वधू सात फेरे घेतात, तेव्हा पंडित त्यांच्याकडून एकमेकांचा आदर करण्याची, विश्वास ठेवण्याची, कौटुंबिक जबाबदाऱ्या मिळून सांभाळण्याची वचनं देतात. आयुष्यभर या वचनांचं पालन करण्याची अपेक्षा वर-वधूकडून केली जाते. नुकताच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंडित कौटुंबिक समतोलाचं महत्त्व समजावून सांगताना एक असं उदाहरण देतात, जे ऐकून उपस्थित पाहुण्यांसह वर आणि वधू दोघंही जोरजोरात हसू लागतात. मंडपात एकच हशा पिकतो.

या व्हिडीओमध्ये पंडित म्हणताना दिसत आहेत की, मुलाचं स्थान आईवडिलांच्या चरणी आणि पत्नीचं स्थान त्याच्या हृदयात असतं. त्यामुळे दोघांपैकी तो कोणालाच सोडू शकत नाही. हीच गोष्ट समजावून सांगताना ते पुढे चक्क ‘निळ्या ड्रम’चं उदाहरण देतात, जे ऐकून सुरुवातीला सर्वजण चकीत होतात, परंतु विनोद समजल्यावर ते हसू लागतात. पंडित म्हणतात, “पती आईवडिलांना आणि पत्नीलाही सोडू शकत नाही. मग त्याला निळ्या ड्रममध्ये जावं लागलं तरी चालेल. पण त्याने दोघांची साथ निभावली पाहिजे.”

पहा व्हिडीओ-

निळ्या ड्रमचा संदर्भ हा 29 वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येशी संबंधित आहे. या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मेरठमधील ही घटना होती. प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या निळ्या ड्रममध्ये टाकून सिमेंट भरल्याची घटना समोर आली होती. 2025 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाला मुस्कान-साहिल केस किंवा यूपी ब्ल्यू ड्रम केस म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा लोकांचा थरकापच उडाला होता. नंतर या प्रकरणावर डॉक्युमेंट्री टाइप वेब सीरिजसुद्धा प्रदर्शित झाली होती.

लग्नाच्या पवित्र वातावरणात अशा प्रकरणाचा उल्लेख पंडितांकडून होणं खरंतर अनपेक्षित आणि चकीत करणार होतं. परंतु वर-वधूला गमतीशीर पद्धतीने वचनं समजावून सांगण्यासाठी त्यांनी विनोदाचा आधार घेतला आणि लग्न टिकवून ठेवण्यासाठी कौटुंबित समतोल. जबाबदारी, आदर किती महत्त्वाचा असतो, हे सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.