कलिंगड सोडा, रेल्वे प्रवासात काकडी खाणं पडू शकतं महागात; व्हिडीओ पाहिल्यानंतर 100 वेळा कराल विचार
रेल्वे प्रवासात काकडी खाताना सावधान! बिहारमधील कटिहार रेल्वे स्टेशनवर खराब काकड्यांना रासायनिक रंगात बुडवून ताजे दाखवल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोग्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र कलिंगड विक्रेत्यांपासून ग्राहकांचे धाबे दणाणले होते. त्यातच आता एका काकडी विक्रेतीचा व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत खराब झालेल्या काकड्यांना चक्क रासायनिक रंगात बुडवून ताजे दाखवण्याचा संतापजनक प्रकार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात भूक लागल्यावर आपण अनेकदा स्टेशनवर मिळणारी काकडी किंवा फळे ताजी समजून विकत घेतो. मात्र, बिहारमधील कटिहार जंक्शनवरील एका व्हायरल व्हिडीओने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला विक्रेता प्लॅटफॉर्मवर काकड्या विकताना दिसत आहे. या व्हिडीओत ती महिला प्लास्टिकच्या डब्यातील गडद हिरव्या रासायनिक रंगात पांढऱ्या पडलेल्या आणि शिळ्या काकड्या बुडवून काढताना पाहायला मिळत आहे. या प्रक्रियेमुळे काही सेकंदातच त्या काकड्या नैसर्गिकरित्या ताज्या आणि चकचकीत दिसू लागतात. मुंबईत अलीकडेच कलिंगड खाल्ल्याने झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर, आता काकडीच्या या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आरोग्यावर होणारे घातक परिणाम
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारच्या रासायनिक काकड्यांचे सेवन म्हणजे सायलेंट किलिंग आहे. यामुळे तुमच्या तब्ब्येतीवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. या कृत्रिम रंगांमुळे यकृत (Liver) आणि मूत्रपिंडाच्या (Kidney) कार्यावर गंभीर परिणाम होतो. या रसायनांमधील घटकांमुळे दीर्घकाळात कर्करोग होण्याचा धोका संभवतो. अशा पदार्थांमुळे उलट्या, जुलाब आणि तीव्र फूड पॉयझनिंग होऊ शकते.
प्रशासनाविरोधात संताप
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रेल्वे स्थानकावरील अन्न सुरक्षा अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) अशा उघड गैरप्रकारांकडे दुर्लक्ष कसे करतात, असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे. केवळ परवाना देणे पुरेसे नसून, खाद्यपदार्थांच्या दर्जाची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सोशल मीडिया पर वायरल यह वीडियो कटिहार रेलवे स्टेशन का बताया जा रहा है, खीरा को हरे रंग से रंगती दिखी महिलाएं। pic.twitter.com/AdVmfTo00G
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 8, 2026
तसेच प्रवाशांनी अस्वाभाविकपणे अतिशय गडद हिरव्या दिसणाऱ्या काकड्या किंवा फळे विकत घेऊ नयेत. शक्यतो उघड्यावरील कापलेली फळे खाणे टाळावे आणि खरेदी केलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.