
तेलंगाणातील आदिलाबाद जिल्ह्यातील चेनूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या शाखेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील कॅशियर नारिगे रविंदर याने ‘लकी भास्कर’ चित्रपट पाहून असे कांड केले ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चला, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे…
खरे तर, कॅशियर नारिगे रविंदर याने 402 ग्राहकांचे रोख रक्कम आणि गहाण ठेवलेले सोने गुपचूप तिजोरीतून काढले आहे. रविंदरने दहा महिन्यांत या चोरीची योजना आखली. त्याने आपल्या नातेवाइकांना, कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांच्या नावावर बँक खाती उघडली आणि ग्राहकांचे पैसे आणि सोने या खात्यांमध्ये हस्तांतरित केले. ही चोरी तेव्हा उघडकीस आली जेव्हा बँकेत तिमाही ऑडिट करण्यात आले. ऑडिट दरम्यान सोने आणि रोख रकमेच्या नोंदींमध्ये मोठी गडबड आढळली. एकूण 13.71 कोटी रुपयांचे नुकसान झाले, ज्यामध्ये 12.61 कोटी रुपयांचे सोने आणि 1.10 कोटी रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश होता.
वाचा: वाल्मिक कराडने तुरुंगात मागितलेली ती मशीन थेट बिग बॉस १९च्या घरात, नेमकं कारण तरी काय?
ऑडिटमध्ये घोटाळा आला समोर
तपासात असे आढळले की, 449 ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या 25.175 किलोग्राम सोन्यापैकी रविंदरने 20.496 किलोग्राम सोने चोरले. याशिवाय त्याने 1.10 कोटी रुपये रोख रक्कम बनावट खात्यांमध्ये टाकली. 22 मे रोजी ऑडिट सुरू झाल्यावर रविंदर कामावर आला नाही, ज्यामुळे बँकेला त्यांच्यावर संशय आला. बँक अधिकाऱ्यांनी ऑडिट अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि फिंगरप्रिंट्सची तपासणी केली, त्यानंतर रविंदर हा या फसवणुकीचा मास्टरमाइंड असल्याचे आढळले.
‘लकी भास्कर’मधून प्रेरणा आणि उडवले कोट्यवधी रुपये
रविंदरने बसर ट्रिपल आयआयटीमधून बी.टेकची पदवी मिळवली होती आणि 2017 मध्ये SBI मध्ये कॅशिअर म्हणून रुजू झाला होता. त्याने चोरलेले पैसे इतर बँकांमध्ये आणि वित्तीय कंपन्यांमध्ये गुंतवले आणि नंतर फरार झाला. तपासात असेही समोर आले की, दोन मुलांचा पिता असलेला रविंदर ऑनलाइन सट्टेबाजीच्या खेळात मोठ्या कर्जात बुडाला होता. असे मानले जाते की, त्याने ‘लकी भास्कर’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन बँकेला फसवण्याची योजना आखली, जेणेकरून तो लवकर श्रीमंत होऊ शकेल.