विमानासारखा हवेत उडून ट्रक थेट घुसला बाथरूममध्ये…कुटुंबाचं काय झालं? काळजात धस्स करणारा Video

आरे देवा! कधीच न पाहिलेला अपघात. ट्रक असा हवेत उडाला की तो थेट एका घराच्या बाथरुममध्येच घुसला. पुढे जे झालं ते पाहून...

विमानासारखा हवेत उडून ट्रक थेट घुसला बाथरूममध्ये...कुटुंबाचं काय झालं? काळजात धस्स करणारा Video
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 20, 2026 | 4:26 PM

America CCTV : अमेरिकेतील टायगार्ड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगाने धावणारा ट्रक मातीच्या ढिगाऱ्यावरून उसळून तब्बल 30 मीटरपर्यंत हवेत झेपावत थेट एका घरात घुसल्याची घटना घडली. सुदैवाने, या भीषण अपघातात घरातील कुटुंबीय थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात गेल्या शुक्रवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक ‘साउथवेस्ट स्कोल्स फेरी रोड’वरून पश्चिमेकडे जात होता. चालक अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घराच्या मुख्य दरवाजावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण अपघात कैद झाला आहे. फुटेजमध्ये ट्रक आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून जोरात उसळताना दिसतो. त्यानंतर तो एका रिटेनिंग वॉलला पार करत थेट घराच्या भिंतीवर जाऊन धडकतो. काही क्षणांसाठी ट्रक अक्षरशः विमानासारखा हवेत उडताना दिसत असल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

ट्रक थेट बाथरूममध्ये घुसला

हा ट्रक डेव्हिड ब्रुडनोक यांच्या घराच्या तळमजल्यावरील बाथरूममध्ये शिरला. स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक यांनी सांगितले, ‘एखादा ट्रक असा हवेत उडत आमच्या घरात येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि संपूर्ण घर हादरले. खाली जाऊन पाहिले असता घराचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसला.

अपघाताच्या वेळी ब्रुडनोक, त्यांची पत्नी आणि त्यांची तीन लहान मुले वरच्या मजल्यावर झोपलेली होती. त्यामुळे ते सर्वजण सुखरूप बचावले. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चालकाविरोधात गुन्हा

अपघातानंतर चालक स्वतः गाडीतून बाहेर पडला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्यात अडकलेल्या एका प्रवाशाला बाहेर काढले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

पोलिसांनी 33 वर्षीय चालक जॅकब हँकिन्स याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि वाहनाचा वेग याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.