
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (AI) क्रिएटिव्हिटीची एक नवीन भाषा आपल्यासमोर मांडली आहे. आज एआयच्या माध्यमातून अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ बनवले जातात आणि सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. अर्थात काहीजण याचा दुरुपयोगसुद्धा करतात, परंतु असेही काही युजर्स किंवा कलाकार आहेत, जे एआय टूलचा सदुपयोग करून काहीतरी हलकंफुलकं आणि तितकाच क्रिएटिव्ह कंटेंट नेटकऱ्यांसाठी बनवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोहडी सण कसा साजरा केला जातो, या सणातील उत्साह कसा असतो.. हे एआय व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पहायला मिळत आहे.
जानेवारी महिन्यात वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत देशभरात साजरा केला जातो. त्याचवेळी उत्तर भारतात, विशेषत: पंजाबमध्ये मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला लोहडी (Lohri) साजरा होतो. या ऋतूमध्ये शेतातून आलेल्या नवीन पिकांसाठी देवाचे आभार मानण्यासाठी लोहडी साजरा केला जातो. तीळ, शेंगदाणे, हरभरा, गूळ यावेळी मोठ्या प्रमाणात पिकतं. आगीभोवती फेर धरून, गाणी गाऊन हा सण साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीत ऋतुनुसार त्या त्या सणांना फार महत्त्व आहे. म्हणूनच लोहडी आला की हिवाळा ऋतुचा शेवटचा टप्पा, हळूहळू दिवस मोठा आणि रात्र छोटी.. या गोष्टी अधोरेखित होतात. या सणामध्ये नवदाम्पत्य आणि नवजात बाळांना विशेष महत्त्व असतं.
लोहडी हा सण उन्हाळ्याच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं. याचवेळी रब्बी पिकांच्या कापणीला सुरुवात होते. शेतातून आलेल्या नव्या पिकांसाठी देवाचे आभार मानले जातात. लोहडी साजरी करताना लोक अग्नीभोवती फेर धरतात. त्याच अग्नीत तीळ, गूळ, मका, शेंगदाणे अर्पण केलं जातं. अग्नीदेव वाईट गोष्टींचा नाश करून समृद्धी आणतो, अशी श्रद्धा यामागे असते. म्हणूनच सूर्यास्त झाल्यानंतर लाकडं होळीसारखी पेटवली जातात. त्यात गूळ, तीळ, शेंगदाणे, मका आणि रेवडी यांसारखे पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करतात. यावेळी पंजाबी महिला आणि पुरुष लोकगीतं गातात, नाचतात. हे सर्व दृश्य या एआय व्हिडीओत अत्यंत समर्पकपणे दाखवण्यात आलं आहे.
या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘क्रिएटिव्हिटीला सलाम’ असं एकाने म्हटलंय. तर ‘एआयच्या माध्यमातून सणांचं समर्पक चित्रण केलं जातंय’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.