
भारतात राहणाऱ्या नागरिकांना परदेशाविषयी नेहमीच नवल राहिले आहे. परदेशात राहणारे लोक काय खातात? तिकडे राहण्यासाठी त्यांनी किती पैसे खर्च करावे लागतात? असे अनेक प्रश्न लोकांना पडतात. सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील डलास शहरात राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती वॉलमार्ट स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या भारतीय वस्तूंचे दर्शन घडवते. तसेच या वस्तूंची किंमत किती आहे हे देखील दाखवते. अमेरिकेत एका पार्ले-जी बिस्कीटाची किंमत ऐकून तुम्हालीही धक्का बसेल.
काय आहे व्हिडीओ?
राजत नावाच्या व्यक्तीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकेतील डलास येथील वॉलमार्टमधील व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये त्याने कॅमेराद्वारे दर्शकांना स्टोअरच्या शेल्फवर ठेवलेल्या डाळी, नमकीन, बिस्किटे आणि विविध मसाले व सॉसचे पॅकेट दाखवले, जे भारतीयांचे आवडते आहेत. व्हिडीओमध्ये राजत सांगतात की, येथे रॉयल ब्रँडच्या डाळी, जसे की मसूर डाळ आणि मूग डाळ, सुमारे 4 डॉलरला मिळतात. हल्दीरामचा खट्टा-मीठा चिवडा आणि आलू भुजिया देखील सुमारे 4 डॉलरला उपलब्ध आहे. पारले, हाइड अँड सीक बिस्किट साधारण 4.5 डॉलरला विकले जाते. एका शेल्फवर त्यांनी पारले-जी, गुड डे, बिर्याणी मसाला, तंदूरी मसाला, बटर चिकन सॉस आणि इतर अनेक उत्पादने दाखवली. राजत म्हणाले की, डलासमध्ये भारतीयांची संख्या खूप आहे, त्यामुळे वॉलमार्टला ग्राहकांच्या गरजेनुसार हे सामान ठेवावे लागते.
राजतचा हा छोटासा व्हिडीओ केवळ भारतीय किराणा मालाची झलकच देत नाही, तर हे देखील दाखवते की मोठे स्टोअर्स स्थानिक मागणीनुसार आपली उत्पादने कशी निवडतात. डलाससारख्या शहरांमध्ये, जिथे भारतीय लोकसंख्या मोठ्या संख्येने आहे, तिथे सुपरमार्केटसाठी हे आवश्यक आहे की ते या समुदायांच्या चवी आणि गरजांचा विचार करतात. तसेच, किंमतींवर झालेली चर्चा हे देखील दर्शवते की, भारतात स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या या वस्तू परदेशात महागड्या किंमतीत खरेदी कराव्या लागतात. तरीही, आपल्या देशाची चव मिळवण्यासाठी लोक या किंमती देण्यास तयार असतात.
एका पारले-जी बिस्कीटाची किंमत किती?
व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया दोन प्रकारच्या होत्या. एका युजरने लिहिले, अरे, भारताच्या तुलनेत इथे तर सर्व काही खूप महाग आहे. दुसऱ्याने म्हटले, चार डॉलरचे हाइड अँड सीक बिस्किट? म्हणजे सुमारे 320 रुपये! भारतात तर हे फक्त 20 रुपयांना मिळते. अर्धा किलो डाळ सुमारे 400 रुपये? कमाल आहे, किती महाग आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनेही लिहिले, अमेरिकेत भारतीय सामान कॅनडाच्या तुलनेत आणखी महाग आहे, विशेषतः जेव्हा आपण डॉलरला कॅनेडियन डॉलरमध्ये रूपांतरित करतो.