
सध्या एका अजब प्रेमाचं गजब प्रकरण समोर आलं आहे. अलिगडमध्ये एक महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेली आहे. विशेष म्हणजे ही महिला घरातील दागिने आणि पैसे घेऊन घरातून पसार झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जनपद अलिगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पळून गेलेल्या महिलेचे नाव कविता आहे. ही महिला ज्या तरुणासोबत पळून गेली आहे, त्याचे नाव राहुल असे आहे. राहुल हा तिचा होणारा जावई होता. पळून गेलेल्या कविताच्या मुलीचे लग्न राहुलसोबत 16 एप्रिल रोजी होणार होते. त्याआधीच ही महिला घरातील अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून गेली आहे.
कविताच्या मुलीचे नाव शिवानी असे आहे. शिवानीचे राहुलशी लग्न होणार होते. तिनेच नेमका काय प्रकार घडला, हे सविस्तरपणे सांगितलंय. “येत्या 16 एप्रिल रोजी माझे लग्न होणार होते. माझ्यासाठी दादो या भागातून वरात येणार होती. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच राहुलने माझ्या आईला फोन गिफ्ट म्हणून दिला होता. मधल्या काळात या दोघांच्या एकमेकांशी खूप गप्पा व्हायच्या. आता माझी आई माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली आहे. ते दोघे पळून गेले याबाबत मला काहीही वाटत नाहीये. पण घरातील पैसे आणि दागिने घेऊन ते पळून गेले आहेत. 6 एप्रिल रोजी माझी आई घरातून पळून गेली आहे,” अशी माहिती या मुलीने दिले आहे.
“माझ्या बायकोने मला तिच्या बहिणीला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पाठवले होते. मात्र मी घरी येऊन पाहतो तर माझी बायको घरी नव्हती. मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. त्यानंतर मी राहुलला फोन केला. पण त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर रात्री 10 वाजता मला त्याचा कॉल आला. तुझ्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. तू कवितासोबत 20 वर्षे राहिला आहेस. आता तू तिला विसरून जा, असं तो मला म्हणाला. मी पोलिसात तक्रार केली आहे,” अशी माहिती पीडित पतीने दिली आहे.
#Aligarh #Aligarhpolice
थाना मडराक क्षेत्र अन्तर्गत एक महिला के अपने घर से बिना बताये कहीं चले जाने की सूचना प्राप्त होने पर गुमशुदगी दर्ज कराते हुए वैधानिक कार्यवाही प्रचलित की गई ।इस सम्बन्ध में क्षेत्राधिकारी इगलास श्री महेश कुमार द्वारा दी गई बाईट-@Uppolice pic.twitter.com/7nIaCDtj2k
— ALIGARH POLICE (@aligarhpolice) April 9, 2025
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला आहे. पोलिसांच्या या तपासात कविता आणि राहुल यांचे काही फोटो आणि रिल्स समोर आले आहेत. त्यावरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, असा अंदाज लावला जात आहे.