
संगीत म्हणजे आत्म्याला स्पर्श करणारी एक अमूर्त भावना. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी जागतिक संगीत दिन (World Music Day) साजरा केला जातो. हा दिवस आज जगभरातील संगीतप्रेमींसाठी खास असतो, कारण यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये संगीतमय कार्यक्रम, परफॉर्मन्स, स्ट्रीट कॉन्सर्ट्स आणि ओपन माइकचे आयोजन केले जाते.
संगीत आणि माणसाचं नातं हे अतूट आहे. आपण आनंदी असलो की गातो, नाचतो आणि जेव्हा दु:खी असतो तेव्हाही हळुवार सूरांत मन शांत करण्याचा प्रयत्न करतो. लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम किंवा अगदी छोट्या भेटीगाठींमध्येही संगीताचं स्थान अबाधित आहे. संगीत केवळ कानाला आनंद देत नाही, तर मनालाही साक्षात स्पर्श करतं. त्यामुळेच आज अनेक ठिकाणी ‘म्युझिक थेरपी’ वापरून उपचार केले जात आहेत.
जागतिक संगीत दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम १९८१ साली फ्रान्समध्ये मांडली गेली. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मौरिस फ्ल्यूरेट यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने २१ जून १९८२ रोजी फ्रान्समध्ये पहिल्यांदा ‘फेटे द ला म्युझिक’ (Fête de la Musique) हा कार्यक्रम झाला. ही संकल्पना इतकी लोकप्रिय ठरली की अल्पावधीतच ती संपूर्ण युरोप आणि नंतर जगभर पसरली.
या दिवशी जगभरात संगीत प्रेमी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. रस्त्यांवर उघड्या जागी परफॉर्मन्स, शाळा-कॉलेजांमध्ये संगीत स्पर्धा, विविध प्रकारचे गायन-वादनाचे कार्यक्रम भरवले जातात. या सगळ्यांचा उद्देश एकच संगीतामधून प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणं.
या दिवशी जगभरात नामांकित कलाकार, नवोदित गायक-वादक आणि संगीत शिक्षक यांचा गौरव केला जातो. अनेक देशांत संगीताच्या विविध शैलींना समर्पित कार्यक्रम आयोजित करून संगीताच्या विविधतेचा सन्मान केला जातो.
आजच्या डिजिटल युगातही संगीताची ताकद कमी झालेली नाही. उलट, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, ऑनलाइन स्ट्रीमिंग अॅप्स आणि सोशल मीडियावर संगीताने मोठं स्थान मिळवलं आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने अनेक ऑनलाइन कॉन्सर्ट, लाईव्ह सत्रं आणि डिजिटल गान महोत्सव साजरे होत आहेत.
1. संगीत ऐकल्याने मन शांत होतं, चिंता आणि तणाव कमी होतो.
2. संगीत मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतं. विद्यार्थ्यांसाठी क्लासिकल म्युझिक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतं.
3. संगीत रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतं, झोप सुधारतं आणि संपूर्ण शरीराला रिलॅक्स करते.
4. आनंद, दु:ख, प्रेम यांसारख्या भावना व्यक्त करण्यासाठी संगीत एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे नातेसंबंधही मजबूत होतात.