IT Refund | 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा परतावा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची माहिती

| Updated on: Feb 10, 2022 | 11:06 AM

नवीन पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे गेल्यावर्षी मुदत वाढ देऊनही करदात्यांना मनस्ताप झाला होता. आता ब-यापैकी हा तांत्रिक मुद्दा सोडवण्यात आला आहे. नवीन आयटी पोर्टलवर प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्याचे काम वेगाने सुरु आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना रिटर्न्स भरण्याचे आवाहन केले आहे. तर रिटर्न भरणा-या करदात्यांना परतावा देण्यास सुरुवात केली आहे.

IT Refund | 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा परतावा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची माहिती
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

Income Tax Refund: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा परतावा दिल्याची माहिती प्राप्तीकर खात्याने (Income Tax Department) दिली आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1,85,65,723 प्रकरणांमध्ये सीबीडीटीने 59,949 कोटी रुपयांचा आयकर परतावा दिला आहे. 2,28,100 प्रकरणांमध्ये 1,07,099 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आला आहे. यामध्ये कर निर्धारण वर्ष 2021-22 (AY 2021-22 ) साठी 1.48 कोटींचा परतावा हा 28,704.38 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे. यापूर्वी सोमवारी आयकर विभागाने नवीन कर पोर्टल सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 6.17 कोटी आयटी रिटर्न (IT Return) आणि 19 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते. 2021-22 या करनिर्धारण वर्षासाठी यात 6.17 कोटी आयटीआर चा समावेश आहे. आयटीआर 1 आणि 2 श्रेणीचा विचार करता यात 48 टक्के किंवा 2.97 कोटी आयटीआर 1 आणि 9 टक्के किंवा 56 लाख आयटीआर 2 आहे.

1.62 कोटींचा परतावा

यापूर्वी जानेवारी महिन्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी 1.79 कोटी करदात्यांना 1.62 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 27,111.40 कोटी रुपयांचा समावेश असून, 1.41 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. “सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत 1.79 कोटी करदात्यांना 1,62,448 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला,” असे कर विभागाने ट्विट केले आहे.

6 फेब्रुवारी 2022 पर्यंत 1.61 लाखांहून अधिक अन्य कर लेखापरीक्षण अहवाल दाखल झाल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. प्राप्तिकर वेळेत भरण्यासाठी खाते करदात्याला ईमेल, एसएमएस आणि ट्विटरद्वारे आठवण करुन देत आहे. करदाते आणि सनदी लेखापालांना (chartered accountant) आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहण्याचे आवाहन खात्याने केले आहे. कर आकारणी वर्ष 2021-22 चा कर लेखापरीक्षण अहवाल किंवा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू न शकलेल्या करदाते किंवा कर व्यावसायिकांनी शेवटच्या क्षणी होणारा विलंब टाळण्यासाठी तो तातडीने भरावा, असे आवाहन प्राप्तिकर खात्याने केले आहे.

सरकारने रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

मार्च 2021अखेर संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कॉर्पोरेट्सना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत सरकारने जानेवारीत 15 मार्चपर्यंत वाढवली होती, तर 2020-21 आर्थिक वर्षासाठी कर लेखापरीक्षण अहवाल दाखल करणे आणि कर लेखापरीक्षण अहवाल हस्तांतरित करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी ही आहे. यात आयटीआर 1 आणि आयटीआर 4 फॉर्मची संख्या सर्वाधिक आहे. आयटीआर 1 फॉर्मला सहज आणि आयटीआर फॉर्म 4 ला सुगम म्हणतात. हे दोन्ही फॉर्म अत्यंत साधे असून, ते लहान व मध्यम करदात्यांनी भरले आहेत. ज्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांची कमाई पगार, घरची मालमत्ता, इतर स्त्रोत जसे व्याज इत्यादींमधून होते. त्यांना सहज अर्ज भरावा लागतो.

आयटीआर-4 व्यक्ती, एचयूएफ आणि कंपन्या एकूण 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आणि व्यवसाय आणि व्यवसायातून उत्पन्न असलेल्या कंपन्या दाखल करू शकतात. आयटीआर-3 हा व्यवसाय/व्यवसायातून नफा कमवणा-या व्यक्ती दाखल करतात. तर आयटीआर-5, 6 आणि 7 अनुक्रमे LLP , बिझनेस आणि ट्रस्ट दाखल करतात. नवीन आयकर पोर्टल 7 जून रोजी सुरू करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?