Banking Transactions News : बँकांमधून पैसे काढणे होणार अवघड! पासबुक दाखवून नाही काढता येणार रोख रक्कम

| Updated on: Jan 14, 2023 | 9:07 PM

Banking Transactions News : बँकेतून रक्कम काढण्यासाठी आता या नवीन नियमांचे पालन करावे लागेल. रोख मिळण्यासाठी ही करावी लागेल कवायत

Banking Transactions News : बँकांमधून पैसे काढणे होणार अवघड! पासबुक दाखवून नाही काढता येणार रोख रक्कम
कर चोरी पकडणार
Follow us on

नवी दिल्ली : एटीएमचा (ATM) वापर न करता अनेक जण बँकेत जाऊन रक्कम काढतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.अशा ग्राहकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यांना आता केवळ पासबुक दाखवून बँकेतून रक्कम काढता येणार नाही. बँकेत रोखीतून व्यवहार (Bank Transaction) करण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. अर्थात हे नियम ग्राहकांच्या फायद्यासाठीच आहे. त्यामुळे ग्राहकांचे खाते तर सुरक्षित राहिलच. पण त्याची ओळख पटविणेही सोपे होईल. तुमच्या पासबुकवर (Passbook) आणि खोट्या स्वाक्षरीवर आता कोणीही बँकेतून रक्कम काढू शकत नाही.

अर्थात यामागे केवळ बँकिंग प्रणालीत पारदर्शकता आणणे एवढाच उद्देश नाही तर कर चोरी करणाऱ्यांची ओळख पटविणे ही या नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. जर तुम्हीही बँकेत जाऊनच व्यवहार पूर्ण करत असाल तर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.

यासंबंधीच्या नियमांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बँकांना या नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानुसार ग्राहकांच्या चेहरा आणि डोळ्यांचे स्कॅनिंग (Face Recognition, Iris Scan) करण्यात येईल. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सने याविषयीचे वृत्त दिले आहे.

हे सुद्धा वाचा

रॉयटर्सने सूत्रांच्या आधारे याविषयीची माहिती दिली. त्यानुसार केंद्र सरकारने बँकांना ग्राहकांच्या चेहऱ्याची ओळख आणि काही प्रकरणात डोळ्यांसाठी आयरिस स्कॅन करण्यास सांगितले आहे. एका निश्चित वार्षिक मर्यादेत वैयक्तिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर होईल.

काही खासगी आणि सार्वजनिक बँकांनी या पर्यायाचा वापर सुरु केला आहे. केंद्राच्या या निर्णयाची वाच्यता यापूर्वी करण्यात आली नव्हती. ग्राहकांना ही नियमीत प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगण्यात येत होते. पण यामागे केंद्र सरकारची दूरदृष्टी आहे.

अर्थात हा पडताळा अनिवार्य करण्यात आलेला नाही. पण काही प्रकरणात ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहिल. करासंबंधी प्रकरणात सरकारी ओळखपत्र, पॅनकार्ड अनेक ठिकाणी बँकांना देण्यात आलेले नाही. पण या नियमामुळे लाखोंचे व्यवहार करणारे मात्र कर न भरणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

आधार कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे, चेहरा आणि डोळे स्कॅन करण्यात येतात. डिसेंबर 2022 मध्ये अर्थ मंत्रालयाने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला (UIDAI) एक पत्र पाठवले. त्यात बोटांचे ठसे व्यवस्थितरित्या उमटत नसतील तर चेहरा ओळख आणि डोळ्यांची आयरिस स्कॅनिंग करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांहून अधिक रक्कमेचा व्यवहार करणारे ग्राहक रडारवर आले आहेत. सध्या हे ग्राहक त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड दाखवितात. पण लवकरच त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.