Gold Hallmarking: नियम लागू झाला, पण हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना दीड महिना वाट पाहावी लागणार

| Updated on: Jun 28, 2021 | 8:17 AM

Gold Hallmarking | केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे.

Gold Hallmarking: नियम लागू झाला, पण हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना दीड महिना वाट पाहावी लागणार
सोन्याचा दर
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Gold Hallmarking in India may delayed)

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

‘या’ शहरांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.

कोणत्या गोष्टींना हॉलमार्किंगच्या नियमातून सूट?

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

(Gold Hallmarking in India may delayed)