कोणाला पैसे उसने द्यावेत आणि कोणाला नाही? कर्ज देण्यापूर्वी सोपे नियम नक्की वाचा

मित्र किंवा नातेवाईकांना कर्ज देताना होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी सांगितलेले काही महत्त्वाचे नियम आणि कायदेशीर उपाय नक्की वाचा.

कोणाला पैसे उसने द्यावेत आणि कोणाला नाही? कर्ज देण्यापूर्वी सोपे नियम नक्की वाचा
Money
| Updated on: Apr 26, 2026 | 3:09 PM

मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करणे ही माणुसकी असली, तरी अनेकदा याच व्यवहारामुळे मैत्रीत दुरावा येतो किंवा दिलेले पैसे कायमचे बुडतात. खाजगी स्तरावर कर्ज देताना होणारे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर मग तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे धोके आणि उपाय सांगितले आहेत.

उत्पन्नाचा स्रोत तपासा

बँका ज्याप्रमाणे ‘सिबिल स्कोअर’ तपासतात, त्याचप्रमाणे तुम्हीही कर्ज देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती पारखणे आवश्यक आहे. ज्यांचे उत्पन्न स्थिर आहे. त्यांना दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते. ज्यांचा उत्पन्नाचा स्रोत निश्चित नाही, त्यांना मोठी रक्कम देणे जोखमीचे ठरू शकते.

कर्जाचे प्रयोजन जाणून घ्या

कर्ज घेणारी व्यक्ती ते पैसे कोठे खर्च करणार आहे, यावर तुमची परतफेड अवलंबून असते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा शिक्षणासाठी दिलेले कर्ज हे गुंतवणूक मानले जाते. परंतु चैनीच्या गोष्टींसाठी किंवा जुने कर्ज फेडण्यासाठी जर कोणी पैसे मागत असेल, तर अशा व्यक्तींना कर्ज देणे टाळलेले बरे असते.

कायदेशीर करार करा

अनेकदा आपण जवळच्या व्यक्तीकडे कागदपत्रांची मागणी करायला संकोच करतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते प्रोमिसरी नोट (Promissory Note) किंवा सामंजस्य करार करणे अत्यंत अनिवार्य आहे. यामध्ये कर्जाची रक्कम, परतफेडीचा दिनांक आणि व्याजाचा दर याचा स्पष्ट उल्लेख असावा. हा करार भविष्यात कायदेशीर पुरावा म्हणून काम करतो.

हप्त्यांमध्ये मदत करण्याचा पर्याय निवडा

जर समोरच्या व्यक्तीला मोठी रक्कम हवी असेल, तर ती सर्वच्या सर्व एकाच वेळी देण्याऐवजी हप्त्यांमध्ये द्या. यामुळे तुमच्यावर एकदम आर्थिक ताण येत नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या परतफेडीच्या शिस्तीचाही अंदाज येतो.

कोणाला कर्ज देणे धोक्याचे?

  • ज्यांनी यापूर्वी लोकांचे पैसे वेळेवर परत केलेले नाहीत.
  • ज्यांना वारंवार उसने पैसे मागण्याची सवय लागली आहे.
  • जे आपली आर्थिक परिस्थिती स्पष्टपणे सांगण्यास टाळाटाळ करतात.

थोडक्यात सांगायचे तर कोणालाही कर्ज देताना आपली स्वतःची आर्थिक सुरक्षा धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. भावनेपेक्षा व्यवहारातील स्पष्टता नाते आणि पैसा दोन्ही टिकवण्यास मदत करते.

Follow Us