Health insurance : आरोग्य विम्याचा दावा का फेटाळला जातो; जाणून घ्या दावा फेटाळला जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?

| Updated on: Jun 15, 2022 | 11:47 AM

अनेकदा आरोग्य विम्याचा दावा काहीतरी कारण सांगून कंपनीकडून फेटाळला जातो. आरोग्य विम्याचा दावा फेटाळला गेल्यास तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. जाणून घेऊयात विमा फेटाळला जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी.

Health insurance : आरोग्य विम्याचा दावा का फेटाळला जातो; जाणून घ्या दावा फेटाळला जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
Follow us on

आरोग्य विमा (Health insurance) खरेदी करणं जेवढं आवश्यक आहे, तेवढंच पॉलिसीच्या (Policy) अटी समजून घेणंही आवश्यक आहे. विमा कंपन्या नियमांकडे बोट दाखवत गरजेच्या वेळी तुम्हाला उपयोगी पडणार नाहीत. संजीवसोबतही असंच घडलंय. संजीवची अ‍ॅन्जोप्लास्टी (Angioplasty) म्हणजेच हृदयातील स्टेंट बसवण्याच्या ऑपरेशनसाठी येणाऱ्या खर्चाचा दावा विमा कंपनीने फेटाळलाय. कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी संजीव न चुकता विमा हप्ता भरत होता, तरीही उधार घेऊन संजीवला हॉस्पिटलचं बिल भरावं लागलं. डिस्चार्ज देताना कंपनी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उशिर करत होती.हृदयविकाराचा कोणताही आजार नव्हता हे सिद्ध करता करता संजीवनं हार मानली. हॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्ज शिटमध्ये रक्तात थेलेसिमियाची कमतरता दिसल्यामुळे विमा कंपनीनं दावा फेटाळला. कंपनीनं विमा खरेदी करतेवेळी आरोग्याबाबत खरी माहिती दिली नाही हे कारण पुढे करत विमा दावा फेटाळला.

विम्याचा दावा का फेटाळला जातो

विमा कंपन्या हॉस्पटिलायझेशन आणि उपचारांच्या कागदपत्रांची खूप बारकाईनं पाहणी करतात. अगदी लहान लहान शब्दाचा अर्थ तपासला जातो. कोणत्याही रोगावर उपचार सुरू असो कंपन्या प्रत्येक लक्षणाचा संबंध हॉस्पिटलायझेशनशी जोडून आरोग्य विम्याचा दावा फेटाळतात. बऱ्याचदा दावा रद्द करण्यासोबतच विमा पॉलिसीही रद्द केली जाते. खरी माहिती न देण्यासोबतच आधीपासूनच असलेल्या आजाराची माहिती न दिल्यामुळे दावे रद्द होतात. प्रत्येक विमा कंपनी वेटिंग पीरियड संपल्यानंतरच त्या आजारांना विमा कवच प्रदान करते. त्यामुळे विमा खरेदी करतेवेळी कंपनीचा फॉर्म स्वत: भरा. अनेकदा विमा विक्री प्रतिनिधी फॉर्म भरत असल्यानं चुकीची माहिती भरली जाते, असं विमा तज्ज्ञ सुनील भंडारी यांनी म्हटले आहे. चुकीची माहिती दिल्याचं कारण पुढे करत विमा कंपन्या हजारो विमा दावे रद्द करतात.

हे सुद्धा वाचा

आठ वर्षांनंतर दावा फेटाळता येत नाही

आयआरडीएच्या वार्षिक अहवालानुसार 2020-21 मध्ये जवळपास 73.11 कोटी रुपयासाठी आलेले 8236 दावे फेटाळण्यात आलेत. चुकीची माहिती दिली म्हणून विमा दावा फेटाळण्यात आल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासंदर्भात निश्चित आकडेवारी नाही. कंपन्याना 300.60 कोटी रुपयांचे दावे मिळाले, त्यातील जवळपास 217.74 कोटी रुपयांचे दावे मंजूर झाले. तर बाकीचे दावे फेटळाण्यात आले. पॉलिसी घेऊन आठ वर्ष झाली आहेत, तसेच दरवर्षी न चुकता हप्ता भरत असल्यास विमा कंपन्या कोणंतही कारण दाखवत विमा दावा रद्द करू शकत नाहीत. IRDAIच्या 2020 च्या नियमानुसार 8 वर्ष मोरोटियम पीरियड मानला जातो. त्यानंतर विमा कंपन्या दावा रद्द करू शकत नाहीत. पॉलिसीधारकांनी दावा मिळवण्यासाठी घोटाळा केलाय हे सिद्ध झाले तरच दावा रद्द होतो.