
“ही थंड आहे, साहेब! थोडेसे एक्स्ट्रा लागतील.” अशा शब्दांत अनेक मद्य दुकानदार ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा (MRP) अधिक पैसे वसूल करताना दिसतात. कधी ‘कूलिंग चार्ज’, कधी ‘सर्व्हिस फी’, तर कधी उघडपणेच जास्त दर आकारला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? अशी विक्री ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार पूर्णतः बेकायदेशीर आहे.
जर कोणी दुकानदार दारूच्या बाटलीवर छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असेल, तर त्याच्याविरोधात तुम्ही तक्रार करू शकता आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. चला, जाणून घेऊया नेमकी काय प्रक्रिया आहे.
दारू विक्रीसंदर्भातील नियम काय ?
भारतात तसेच महाराष्ट्रात दारू विक्रीसाठी विशिष्ट नियम आणि कायदे आहेत, जे विक्रेत्यांना बंधनकारक असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे MRP (Maximum Retail Price) म्हणजेच दारूच्या बाटलीवर छापिल असलेल्या किंमतीपेक्षा अधिक दराने ती विकता येत नाही. जर एखादा दुकानदार यापेक्षा अधिक पैसे घेत असेल, तर तो कायद्याचा भंग करत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियम स्पष्टपणे सांगतात की, परवानाधारक विक्रेत्याने केवळ अधिकृत दर सूचीप्रमाणेच मद्य विकावे. कोणत्याही परिस्थितीत “कूलिंग चार्ज”, “सर्व्हिस चार्ज” किंवा इतर स्वरूपात अतिरिक्त रक्कम आकारता येत नाही. Legal Metrology Act, 2009 आणि Consumer Protection Act, 2019 हे कायदे ग्राहकांना याविरोधात संरक्षण देतात. ग्राहकाची फसवणूक केल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये दंड, परवाना रद्द करणे किंवा दुकान सील करणे यांचा समावेश होतो.
तक्रार कशी कराल?
1. जास्त दराने विक्री झाल्यास त्याची पावती किंवा पुरावा ठेवणे आवश्यक आहे. पावती नसली तरी, दुकानदाराचा फोटो, नाव, दुकानाचं ठिकाण, तारीख व वेळ यांची माहिती असलेला पुरावा उपयोगी ठरतो.
2. महाराष्ट्रातील उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरून (https://excise.maharashtra.gov.in) तक्रार करता येते.
किंवा स्थानिक उत्पादन शुल्क अधिकारी (Excise Inspector) यांच्याशी थेट संपर्क साधून लेखी तक्रार करता येते.
3. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या वेबसाइटवर (https://consumerhelpline.gov.in) ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.
तसेच 1915 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करूनही मदत मिळू शकते.
4. जर दुकानदार जबरदस्तीने पैसे घेत असेल किंवा धमकी दिली असेल, तर थेट पोलीस ठाण्यात तक्रार देणेही शक्य आहे.
कायदेशीर कारवाई काय होऊ शकते?
1. दारू दुकानावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करून परवाना रद्द करू शकतो.
2. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ₹25,000 ते ₹1 लाख पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
3. वारंवार तक्रारी असल्यास कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते.
ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?
ग्राहकांनी दारू खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वप्रथम, दारूच्या बाटलीवर छापील असलेली किंमत (MRP) नीट तपासावी. विक्रेत्याने जर ‘कूलिंग चार्ज’ किंवा इतर कोणतेही अतिरिक्त शुल्क मागितले, तर त्याबाबत स्पष्ट माहिती मागून अधिक शुल्क दिल्यास त्याची पावती घ्यावी. कोणतीही गैरप्रकार किंवा जबरदस्ती आढळल्यास त्वरित मोबाईलमध्ये पुरावा (जसे की बिल, दुकानाचं नाव, तारीख, वेळ) जतन करावा. अशा प्रकारची माहिती असल्यानंतर ग्राहक संरक्षण मंच किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करणे सोपे जाते.