Insurance : आता इन्शुरन्स कंपनीलाच इन्शुरन्सची गरज! तब्बल 40 लाख ग्राहकांचा डेटा हॅक..

Insurance : या विमा कंपनीला सायबर भामट्यांनी मोठा चूना लावला आहे..ग्राहकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे..

Insurance : आता इन्शुरन्स कंपनीलाच इन्शुरन्सची गरज! तब्बल 40 लाख ग्राहकांचा डेटा हॅक..
विमा कंपनीला दणका
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 26, 2022 | 8:10 PM

नवी दिल्ली : सध्याच्या काळात विम्याची(Insurance) सर्वाधिक आवश्यकता असते. जर एखाद्याकडे मेडिकल इन्शुरन्स (Medical Insurance) असेल तर लोकांना मेडिकल खर्चात (Expenditure) मोठी कपात होते आणि त्यांना दिलासा मिळतो. मेडिकल क्लेममध्ये ग्राहकांची खासगी माहिती नोंदवण्यात येते. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडे ग्राहकांची व्यक्तिगत (Personal) आणि उपचारासंबंधीची (Treatment) महत्वाची माहिती असते.

आता व्यक्तिगत आणि रोगासंबंधीची गोपनीय माहिती विमा कंपन्यांकडे ग्राहक विश्वासाने आणि डोळे झाकून देतात. कारण ऐनवेळी त्यांना उपाचारासाठी सवलत मिळते. त्यांना या माहिती आधारे दावा मंजूर करताना फायदा होतो.

पण ही वैयक्तिक माहिती आणि ग्राहकांचा डेटा जर सायबर भामट्यांनी हॅक केला तर? तर ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात येते. त्यांच्या या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. अनेकांना यामाध्यमातून तोटा होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी मेडिबैंकसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. एवढी हायटेक कंपनी पण सायबर भामट्यांनी तिच्या सुरक्षेला सुरुंग लावला आणि आता ग्राहकांवर चिंतेचे ढग आले आहेत.

या कंपनीच्या सर्वच सर्व ग्राहक म्हणजे 40 लाख ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे. हा डेटा सायबर भामट्याने हॅक केला आहे. त्यामुळे कंपनीसह ग्राहकांचेही धाबे दणाणले आहे.

कंपनी तर दुहेरी पेचात अडकली आहे. ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार या कंपनीला आता जबर आर्थिक भूर्दंड बसणार आहे. कारण कंपनी ग्राहकांची खासगी माहिती सुरक्षित ठेऊ शकली नाही.

विशेष म्हणजे सायबर भामट्यांनी मोठ्या संख्येने डेटा हॅक केला. त्यात चिंतेचे कारण पुढे आले आहे. ते म्हणजे मेडिकल क्लेमपर्यंत डेटा हॅकचे लोन पसरले आहे. त्यामुळे वैयक्तिक माहितीसह ग्राहकांच्या बँकेचा तपशील ही प्रभावित होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या सायबर भामट्यांनी कंपनीला ब्लॅकमेल करण्यासही सुरुवात केली आहे. त्याने कंपनीशी संपर्क केला आहे. यातील हाय प्रोफाईल ग्राहकांच्या रोगाची आणि इतर माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देत, मोठ्या रक्कमेची आरोपींनी मागणी केली आहे.