Petrol-Diesel Price Today: अहो आश्चर्यम! सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

| Updated on: Jul 24, 2021 | 10:42 AM

Petrol & Diesel rates | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमतीवरही परिणाम पाहायला मिळत आहे.

Petrol-Diesel Price Today: अहो आश्चर्यम! सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.

मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने हे इंधन स्वस्त होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमतीवरही परिणाम पाहायला मिळत आहे.

मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही.

केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यास पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही. परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

(Petrol and Diesel rates in India)