
आपण जेव्हा आपल्याला रोजच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांची खरेदी करतो तेव्हा बहुतेकदा पॅकेजवरील एक्सपायरी डेट तपासतो. कारण हे पॅक केलेले पदार्थ एका ठराविक काळावधीनंतर खराब होतात, म्हणजेच हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे बाजारातील खरेदी केलेले पॅकेज फुडवर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट लिहलेली असते. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही खराब होत नाहीत? काही पदार्थ तुम्ही जर स्वयंपाकघरात योग्यरित्या साठवून ठेवले तर ते बरेच महिने नाही तर वर्षानूवर्ष चांगले राहतात आणि त्यांची चव आणि गुणवत्ता उत्तम राहते. या पदार्थांमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे ते इतके दिवस टिकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा 10 पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे कधीही एक्सपायरी होत नाहीत आणि ते सहजपणे दीर्घकाळ साठवता येतात.
मध
आरोग्यासाठी फायदेशीर मानला जाणारा मधही याच श्रेणीत आहे. मध हे कधीच खराब होत नाही. कारण त्यात खूप कमी पाणी असते, त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. जर मध शुद्ध आणि भेसळरहित असेल तर ते शतकानुशतके टिकू शकते. शास्त्रज्ञांना हजारो वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन दफनभूमीत खाण्यायोग्य मध देखील सापडला आहे.
मीठ
मीठालाही एक्सपायरी डेट नसते, म्हणून ते कधीही खराब होत नाही. जोपर्यंत मीठात आयोडीन किंवा अँटी-केकिंग एजंट्ससारखे पदार्थ नसतात तोपर्यंत ते कायमचे चांगले राहते. शुद्ध समुद्री मीठ वर्षानुवर्षे त्याची मूळ चव टिकवून ठेवते.
साखर
साखर मीठासारखी कधीही खराब होत नाही कारण त्यात ओलावा नसतो. कालांतराने साखर घट्ट होऊ शकते. फक्त साखर ओलावा आणि कीटकांपासून दूर ठेवा.
तांदूळ
तुम्ही जर पांढरे तांदूळ हवाबंद डब्यात थंड, कोरड्या जागी साठवले तर ते 25 ते 30 वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ टिकू शकतात. याचे कारण म्हणजे पांढऱ्या तांदळात तेल नसते, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही.
कडधान्य
कडधान्यामध्ये जवळजवळ सर्व ओलावा निघून जातो, म्हणून ते बरेच वर्ष टिकतात. तसेच यातील प्रथिने आणि पोषक तत्वेही तशीच राहतात.
पांढरा व्हिनेगर
पांढरा व्हिनेगर हा अत्यंत आम्लयुक्त असतो. त्याची आम्लता त्याला अप्रतिरोधक, रासायनिकदृष्ट्या स्थिर बनवते आणि त्याची चव आणि गुणवत्ता वर्षानुवर्षे सारखीच राहते. स्वच्छतेपासून ते स्वयंपाकापर्यंत विविध कारणांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
कॉर्नस्टार्च
कॉर्नस्टार्चमध्ये फॅट किंवा प्रथिने नसतात, म्हणूनच ते कधीही खराब होत नाही. जर ते तुम्ही आर्द्रतेपासून दूर हवाबंद डब्यात साठवले तर ते कायमचे वापरण्यायोग्य राहते.
इन्स्टंट कॉफी
इन्स्टंट कॉफी बनवताना त्यामधून पाण्याची मात्रा पूर्णपणे काढून टाकतात. त्यामुळे इन्स्टंट कॉफी कधीच खराब होत नाही. योग्यरित्या पॅक केल्यास ती एक्सपायरी डेटनंतरही सेवन करता येते, कारण ती बराच काळ सुरक्षित राहते.
सोया सॉस
फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमुळे सोया सॉस बराच काळ खराब होत नाही. जर बाटली सीलबंद केली असेल आणि त्यात कोणतेही रसायने किंवा प्रिजर्वेटिव्ह जोडलेले नसतील तर सोया सॉस बरेच काळ टिकू शकते. कालांतराने त्याची चव देखील सारखीच राहते.
व्हिस्की, रम आणि वोडका
व्हिस्की, रम आणि वोडका सारख्या हार्ड ड्रिंक्समध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. हे अल्कोहोल बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखते. जोपर्यंत बाटली सीलबंद आहे तोपर्यंत ती कधीच खराब होणार नाही. उघडल्यानंतर चवीत थोडासा बदल होऊ शकतो, पण ती खराब होणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)