निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही म्हणून हे वेडे चाळे? जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Nov 14, 2022 | 11:42 AM

हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसायचं आणि मुलुंड आलं का विचारायचं, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही म्हणून हे वेडे चाळे? जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः रविवारी रात्री मुंब्रा येथील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्याने (BJP Woman Leader) केला आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त होऊन, आमदारकीचाच राजीनामा (Resignation) देतो, असं ट्विट केलं. मात्र आरोपांचा आणि राजीनाम्याचा काय संबंध, असा सवाल करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आव्हाड यांनाच वेड्यात काढलंय.

हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसायचं आणि मुलुंड आलं का विचारायचं, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. निर्दोषत्व सिद्ध करता येत नसले तेव्हा असे वेडे चाळे सूचतात असं शेलार म्हणालेत.

पाहा आशिष शेलार काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावरून प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, ‘ आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का, असं विचारण्यासारखंय…

जर ते निर्दोष आहेत तर कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. ते सिद्ध करता येत नसेल तेव्हा हे वेडे चाळे केले जातात.
त्यामुळे या आरोपांचा आणि आमदारकीचा संबंध नाही. सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी कुटुंबाला, आरोप प्रत्यारोप, विनयभंग, दादागिरी करू नये… केल्यास त्यावर कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय. म्हणून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतोय, असं वक्तव्य शेलार यांनी केलं.

माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी माणसाला शोभणारं वक्तव्य जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय.