Mumbai Fire : विधानभवन प्रवेशद्वारावर आग नेमकी कशाने लागली? विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले…
एकीकडे आज विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा क्रार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी दुपारी तीन सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागण्याची घटना घडली. विधानभवनातील ज्या ठिकाणाहून अभ्यागतांना सोडले जाते त्याच प्रवेशद्वारावर ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवलं जातंय. दरम्यान, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी या आगीसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले. विधानभवनाच्या स्वागत कक्षाच्या परिसरात ही आग लागली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असून आगीचं स्वरुप छोटं होतं. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.