मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले, सोबत हजारो गाड्यांचा ताफा रवाना
मराठा आंदोलक मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते अंतरवाली सराटीतून आज 27 ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे निघालेले आहेत. त्यांचे जागोजागी फुले उधळत मराठा बांधव स्वागत करीत आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास कोर्टाने मनाई केली आहे. तरीही मनोज जरांगे आधी सांगितल्याप्रमाणे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा असून एम्ब्युलन्ससह या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. राज्य सरकारने शिंदे समितीला आणखी सहा महिन्यांची मुदत वाढवून दिलेली आहे. गणपतीच्या दिवसात मुंबईत प्रचंड गर्दी असल्याने जरांगे यांनी आंदोलन तूर्त मागे घ्यावे अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक अनेक नेत्यांनी घेतली आहे. तरीही मनोज जरांगे यांनी सरकारला दोन वर्षे दिली आहेत. आणखी किती वेळ देणार अशी ताठर भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता जरांगे यांना सरकार मुंबईत येऊ देते काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

