Pahalagam Attack Updates : ‘वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ‘, हर्षल लेलेने सांगितला ‘तो’ थरारक अनुभव
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या तिन्ही कुटुंबांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
आतंकवादी विचारात होते, तुमच्यातलं हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? त्यावेळी माझे काका हेमंत जोशी यांनी त्यांना संजवण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवाद्याने त्यांना गोळी मारली. त्यानंतर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. हिंदू कोण आहे? त्यावर माझ्या वडिलांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळीच त्यांना डोक्यात गोळी मारली, असं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने सांगितलं. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मुंबईच्या डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल माने यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघे मावस भाऊ होते. या घटनेनंतर आज लेले, जोशी आणि मोने कुटुंबाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला.
पुढे बोलताना हर्षल लेलेने सांगितलं की, त्याठिकाणी गाड्या जात नाहीत. घोड्याने जावे यावे लागते. घोड्यावरून खाली यायला 3 तास लागतात. माझ्या आईला पॅरलिसीस आहे. त्यानंतर तिला खाली आल्यानंतर रुग्णालयात नेलं. मी आणि माझा भाऊ चालत खाली आलो. फायरिंग अडीच वाजता झाली होती. आम्ही साडे पाच ते सहा वाजता खाली आलो. आम्ही त्या दरम्यान सुन्न होतो. नंतर मला कळलं की तीन जणांचा मृत्यू झाला आहे, हे सांगताना हर्षलला अश्रु अनावर झाले.