AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?

MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?

| Updated on: Aug 10, 2026 | 2:11 PM
Share

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी अनिशा माजगावकर यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील मनसेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी अनिशा माजगावकर यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील मनसेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मधून अनिशा माजगावकर यांना निवडणूक लढवायची होती. मात्र, जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्याने मनसेला ती जागा सोडावी लागली. त्यानंतर अनिशा माजगावकर यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरी करत ठाकरे गटाच्या उमेदवार राजोल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी भांडूपच्या जागेबाबत आपली नाराजी व्यक्त केली. “भांडूपच्या जागेबाबत जे झालं, ते चुकीचं झालं. मीही त्या जागेसाठी तेव्हा आग्रही होतो,” असे राज ठाकरे यांनी अनिशा माजगावकर यांच्याशी बोलताना सांगितल्याची माहिती आहे. तसेच, “भांडूपची ती जागा आपल्याला मिळाली असती तर आपण तिथेही जिंकलो असतो,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यावर्षी जानेवारीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवण्यात आले होते, तर मनसेला 52 जागा मिळाल्या होत्या. याच जागावाटपाच्या प्रक्रियेत भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 वरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

मनसेने युतीधर्म पाळत ही जागा ठाकरे गटाला सोडली. मात्र, अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. ठाकरे गटाकडून राजोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी निवडणूक जिंकली.

राजोल पाटील या खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आहेत. संजय दीना पाटील यांनी नंतर बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर भांडूपमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राजोल पाटील यांच्या पक्षातील भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, राजोल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत आपण ठाकरे गटासोबतच असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, आता अनिशा माजगावकर पुन्हा मनसेमध्ये सक्रिय होणार असल्याने भांडूपच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याने मनसे आगामी काळात भांडूपमध्ये आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजोल पाटील आणि संजय दीना पाटील यांच्यासमोरील राजकीय आव्हानही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 10, 2026 02:05 PM

Follow Us